विरोधकांच्या आरोपांनंतर अजित पवारांनी दिली 65 कारखान्यांची यादी

पुणे,

गेल्या काही दिवसांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबातील व्यक्तीवर तसेच त्यांच्या संबंधित विविध साखर कारखान्यांवर आयकर विभागाच्यावतीने छापेमारी करण्यात आली. जवळपास पाच ते सात दिवस ही चौकशी सुरू होती. याबाबत मध्यंतरी अजित पवार यांनी भाष्य करत म्हटलं होतं, की कोणता कारखाना कोणी कितीला विकला, का विकला याबाबत सविस्तर माहिती देईल आणि आज एकूण 65 कारखान्यांची यादी अजित पवार यांनी वाचवून दाखवली. काही जण पुन्हा पुन्हा तेच खोटे आरोप करून बदनामी करत आहेत. काही लोकांनी 25 हजार तर काही लोकांनी 10 हजार कोटींचे घोटाळे झाल्याचे आरोप केले. त्यावर वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी चौकशी देखील केली. परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही, असे अजित पवार म्हणाले.

राज्यातील साखर कारखाने विकले गेले. त्यावर कोणीही चर्चा करत नाही. बोलायच नाही. 64 वेग-वेगळे कारखाने काही कंपन्यांनी विकत घेतले. तर काहींनी विकत घेऊन दुसर्‍याला चालवायला दिले, असल्याचेही यावेळी अजित पवार यांनी सांगितले.

बेईमानी केली असेल तर गुन्हा दाखल करावा –

जरंडेश्वरबद्दल सातत्याने माझ्या घरातील व्यक्तींचा उल्लेख केला जात आहे. त्याबद्दल मला महाराष्ट्रातील नागरिकांना एक गोष्ट स्पष्ट सांगायची आहे की ज्याच्यामुळे कारखान्यांचे नुकसान झाले ते पुढे येऊन काही बोलत नाही. बदनामी करण्यासाठी जनतेची दिशाभूल करण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा बँकेने जरंडेश्वर सहकारी कारखान्याचे टाकलेले पैसे न भरल्याने कारखाना हा ताब्यात घेतला आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना विकत घेण्यासाठी अनेक निविदा आल्या होत्या. या कारखान्यात कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही, असा उच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. जर कोणी बेइमानी केली असेल तर त्यावर गुन्हा दाखल करावा, असे आवाहन देखील यावेळी अजित पवार यांनी केले.

कारखाने चांगले चालवायला मॅनेजमेंट चांगली लागते –

आज राज्यात काही कारखाने चांगल्या पद्धतीने चालत आहे. तर काही कारखाने हे डबघाईला आलेले आहेत. चांगले कारखाने का चालतात, तर त्या कारखान्यांचं मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने चाललेलं असते. तर काही कारखाने आजारी का पडतात, तर ते त्यांच मॅनेजमेंट हे गलथान कारभार करते. कारखाने चालवणे हे कोणाही येड्या-गबाड्याचा काम नाही. त्यासाठी मॅनेजमेंट हे चांगल्या पद्धतीने लागते, असेही पवार म्हणाले.

काही जण बोंबलत फिरतात –

किरीट सोमय्या यांच्या आरोपावर अजित पवार म्हणाले, की माझा म्हणणं किंवा त्यांचा म्हणणं बाजूला ठेवा. केंद्राने आणि राज्याने जे पाहिले आहे, ते सगळं पुढे येईल. केंद्रीय तपास यत्रणांनी तपास केला आहे आणि तो तपास सर्वांपुढे येणारच आहे. काहीजण बोंबलत फिरायला मोकळे आहेत. त्यांच्यावर मला बोलायचं नाही. मी बेईमानी केली आहे, असं म्हणत आहे. त्यांना जणांची नाही तर मनाची वाटली पाहिजे, अशी टिका देखील यावेळी अजित पवार यांनी केली.

आत्ता काय भाषण करू का –

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, या शब्दात अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या. यावर पत्रकारांनी एवढ्याच शुभेच्छा का असं म्हटल्यावर अजित पवार म्हणाले आता काय भाषण करू का.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!