व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विविध विभागांच्या योजनांची सांगड घालण्यात यावी – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाच्या बैठकीत २०२१-२२ अर्थसंकल्पाला मंजुरी
मुंबई, दि, २२ :
राज्यातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांचे व्यवस्थापन तसेच वाघ आणि अन्य वन्यजीवांसह संपूर्ण जैवविविधतेचे संवर्धन करताना स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विविध विभागांच्या योजनांची सांगड घालण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज येथे दिले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात व्याघ्र संवर्धन नियामक मंडळाच्या बैठकीत २०२१-२०२२ या वर्षाच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, गृह व वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष जयस्वाल, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) जी. साईप्रकाश, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, विविध व्याघ्र प्रकल्पांचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक तसेच मदत पूनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार, वन्यजीव मंडळाचे सदस्य, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, मानद वन्यजीव रक्षक आदी मान्यवर दूरदृश्य माध्यमातून उपस्थित होते.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, राज्यातील व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या रस्ता दुभाजकामुळे होणारे वाघांसह, वन्यजीव अपघातांना बळी पडत आहेत, हे टाळण्यासाठी केंद्राच्या संबंधित यंत्रणेला तत्काळ कळविण्यात यावे. याचा पाठपुरावा करून वन विभागाने वाघांचा मार्ग मोकळा करावा. रेल्वे मार्गामुळे होणारे अपघात टाळण्यासाठीही प्रयत्न करावे. जंगलावर अवलंबून असणाऱ्यांना वनक्षेत्र विविध लगतच्या परिसरातील स्थानिकांना विविध विभागांच्या योजनांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन द्यावे. पर्यटनाला चालना देण्यासाठी अंतर्गत रस्त्यांची कामे दर्जेदार करण्यात यावीत.
बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सुचनांचा सकारात्मक विचार करण्यात यावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. बैठकीत मेळघाट व्याघ्र प्रकल्प, नवेगाव -नागझिरा, ताडोबा-अंधारी, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, पेंच-बोर व्याघ्र या प्रकल्पांच्या संचालकांनी प्रकल्पांच्या वाटचालीचा आढावा तसेच आर्थिक बाबींची माहिती सादर केली. प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्थानिकांसाठीच्या योजना त्यामध्ये रोजगार संधी, पर्यटन सुविधा, जाणीव जागृती, निसर्ग शिक्षण तसेच पायाभूत विकास कामे, नाविन्यपूर्ण उपक्रम आदींची माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ताडोबा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.