इंझमाम म्हणतो, टीम इंडियाच विश्वचषक विजेतेपदाचा दावेदार
इस्लामाबाद,
टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाचा पहिलाच सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्याबाबत दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यातच पाकिस्तानचा दिग्गज माजी कर्णधार इंझमाम उल हक याने यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदासाठी भारतच प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे. यूएईतील परिस्थिती उपखंडातील परिस्थीतीसारखीच असल्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाची विजेतेपदासाठी शक्यता अधिक असल्याचे इंझमामने म्हटले आहे.
ऑॅस्ट्रेलियाविरुद्धचा सराव सामना भारताने सहजपणे जिंकला. उपखंडातील अशा खेळपट्ट्यांवर भारत जगातील सर्वात घातक टी-20 क्रिकेट संघ ठरतो. 155 धावांचे लक्ष्य भारताने सहजपणे गाठले आणि विराट कोहलीलाही फलंदाजीची या सामन्यात गरज भासली नाही. कोणत्याही स्पर्धेत नेमका कोणता संघ जिंकेल असा दावा केला जाऊ शकत नाही. पण असे असले तरी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी इतर संघांच्या तुलनेत भारतीय संघाच्या विजयाची शक्यता अधिक असल्याचे इंझमाम उल हकने आपल्या यूट्यूब चॅनलवरील कार्यक्रमात म्हटले आहे.
अनेक अनुभवी खेळाडू भारतीय संघात आहेत. फलंदाजीसोबतच गोलंदाजी देखील मजबूत आहे. जसजसे सामने होत जातील, तसे यूएईच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना साथ मिळेल. यात रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंना मोठी मदत होईल, असेही इंझमाम म्हणाला.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 24 ऑॅक्टोबर रोजी होणारा सामना स्पर्धेच्या अंतिम सामन्यासारखाच आहे. इतर कोणत्याही सामन्याला जेवढे महत्त्व नसेल तेवढे महत्त्व या सामन्याला असणार आहे. 2017 साली देखील चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारत-पाक सामन्याने स्पर्धेची सुरुवात आणि शेवट झाला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेले ते दोन्ही सामने फायनल सारखेच होते. त्यामुळे भारत-पाक सामना जो संघ जिंकेल त्या संघाचे मनोबल प्रचंढ वाढेल आणि संघावरील 50 टक्के दबाव देखील संपुष्टात येईल, असे इंझमाम म्हणाला.