पाकिस्तानविरोधात कसा असेल भारतीय संघ? इरफान पठाणने निवडला संभावित संघ
नवी दिल्ली,
संयुक्त अरब अमीरात (यूएई) आणि ओमानमध्ये टी-20 विश्वचषकाचा थरार सुरु झाला आहे. भारतीय संघानं आपल्या दोन्ही वॉर्म-अप सामन्यात दणदणीत विजय मिळवला. विश्वचषकातील भारताचा पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरोधत होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ कसा असेल? कुणाची वर्णी लागणार? हार्दिक पांड्याला संधी मिळणार का? जाडेजासोबत दुसरा फिरकी गोलंदाज कोण असले? वेगवान गोलंदाज कोण असतील? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. भारतीय संघाचे माजी खेळाडू विविध कार्यक्रमात पाकिस्तानविरोधात संभावित भारतीय संघाची निवड करत आहेत. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण यानेही भारताचा संभावित संघ निवडला आहे.
इरफान पठाणने आपल्या संभावित संघात अनुभवी अश्विनला संधी दिली नाही. तर वेगवान गोलंदाज म्हणून भुवनेश्वर कुमारला स्थान दिलेय. इरफान पठाण यानं तीन वेगवान गोलंदाजांना स्थान दिलेय तर एक स्पेशालिस्ट फिरकीपटू संघात घेतलाय.
इरफान पठाणचा संभावित भारतीय संघ –
के.एल. राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सुर्यकुमार यादव, ॠषभ पंत (विकेटकिपर),हार्किक पांड्या, रविंद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
विश्वचषकात भारत पाकिस्तानवर भारी –
टी-20 आणि एकदिवसीय सामन्याच्या विश्वचषकात पाकिस्तानला भारताविरोधात आतापर्यंत एकदाही विजय मिळवता आला नाही. भारतीय संघाना आतापर्यंत 12 वेळा पाकिस्तानचा पराभव केला आहे. एकदिवसीय सामन्याच्या विश्वचषकात भारतीय संघानं सातवेला पाकिस्तानला धूळ चारली आहे. तर टी-20 विश्वचषकात 5 वेळा पराभव केलाय. विश्वचषकात भारतीय संघाचं पारडं जड मानलं जातं आहे.