सोन्याची चकाकी फिकी; दोन दिवसांत दीड हजारांची घसरण, ’हे’ आहे प्रमुख कारण

जळगाव प्रतिनिधी

17 ऑगस्ट

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वधारत असलेले सोन्याचे दर गेल्या दोन दिवसांत दीड हजार रुपयांनी घसरले आहेत. सुवर्णनगरी म्हणून देशभर लौकिक असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात गुरुवारी सोन्याचे दर तब्बल 1 हजार 200 ते 1 हजार 250 रुपयांनी खाली आले. एकीकडे सोन्याची चकाकी फिकी पडलेली असताना दुसरीकडे चांदीच्या दरातदेखील मोठी घसरण झाली आहे. चांदीचे दर अडीच हजारांनी कमी झाले आहेत.

सोने व चांदीच्या दरांवर आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा मोठा परिणाम होत असतो. सध्या अमेरिकन डॉलरचे मोठ्या प्रमाणावर अवमुल्यन होत असल्याने सोने व चांदी या दोन्ही धातूंचे दर घसरत आहेत. गुरुवारी जळगाव सराफ बाजारात सोन्याचे दर तब्बल 1 हजार 200 ते 1 हजार 250 रुपयांनी घसरले. तर, चांदीही प्रतिकिलो मागे अडीच हजारांनी कमी झाली.

जळगावच्या सराफ बाजारात सोमवारी (14 जून) सोन्याचे दर 48 हजार 345 इतके होते. त्यानंतर मंगळवारी (15 जून) सोन्याच्या दरात प्रतितोळा 253 रुपयांची वाढ झाल्याने दर 48 हजार 598 झाले होते. बुधवारी (16 जून) सोन्याचे दर 254 रुपयांनी खाली आल्याने 48 हजार 344 रुपये प्रतितोळा झाले होते. गुरुवारी सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण नोंदवली गेली. गुरुवारी जळगावात सोन्याचे दर प्रतितोळा 47 हजार 100 रुपये असे होते. 3 टक्के जीएसटीसह सोन्याचे दर 48 हजार 378 रुपये होते.

चांदीच्या दरात सध्या मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी चांदीचे दर प्रतिकिलोसाठी 71 हजार 500 रुपये होते. हेच दर गुरुवारी 68 हजार 500 रुपयांपर्यंत खाली आले. डॉलरचे अशाच प्रकारे अवमुल्यन सुरू राहिले तर सोने व चांदीचे दर अजून खाली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोने व चांदीच्या दरातील घसरणीसंदर्भात बोलताना जळगाव जिल्हा सराफ असोसिएशनचे सचिव स्वरुपकुमार लुंकड म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या अमेरिकन डॉलरचे अवमुल्यन झाले आहे. त्यामुळे, सोने व चांदीचे दर कमी होत आहेत. स्थानिक बाजारपेठेतही सोने व चांदीचे दर मोठ्या प्रमाणावर घसरत असून, ही एकप्रकारे गुंतवणुकीसह खरेदीदारांना नामी संधी चालून आली आहे. भविष्यातही डॉलर कमकुवत होत गेला, तर हे दर अजून खाली येतील, असेही लुंकड यांनी सांगितले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!