टी 20 वर्ल्ड कप, टीम इंडियापुढे बायोबबलचे मोठे आव्हान
नवी दिल्ली,
टी 20 वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियापुढे अन्य कोणत्याही देशांच्या टीम पेक्षा बायोबबलचे मोठे आव्हान असेल असे म्हटले जात आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय सल्लागार डॉ. आहुजा यांच्या मते बायोबबल ही टीम इंडिया साठी चिंतेची बाब आहे. याचे कारण म्हणजे इंग्लंड दौर्यावरून परतल्यावर लगेच टीम इंडिया आयपीएल साठी बायोबबल मध्ये होती आणि आता पुन्हा एकदा आयसीसी टी 20 वर्ल्ड कप साठी बायोबबल मध्ये जावे लागणार आहे. म्हणजे टीम इंडिया दीर्घ काळ बायोबबल मध्ये आहे. त्यामुळे त्यांना बाहेरच्या वातावरणात राहून ताजेतावाने होण्यास वेळ मिळालेला नाही.
टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली याचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला होता. त्यात विराट एका खुर्चीवर बांधलेल्या अवस्थेत आणि जीभ बाहेर काढून बसलेला दिसत होता. त्या फोटोच्या कॅप्शन मध्ये विराटने बायोबबलमध्ये राहून अशी अवस्था होते असे म्हटले होते. त्याचा संदर्भ देऊन डॉ.आहुजा म्हणाले, बायोबबल मुळे खेळाडूंवर अनेक बंधने येतात. सतत एकाच प्रकारची माणसे, जागा यांचा मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो आणि बायोबबल मध्ये सतत राहण्याने येणारा मानसिक थकवा आता सर्वसामान्य बाब झाला आहे. मानसिक थकवा शरीरावर सुद्धा परिणाम करतो आणि त्यामुळे टीम इंडियाच्या कामगिरीवर प्रतिकूल परिणाम घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आयसीसीने टी 20 वर्ल्ड कप बायोबबल साठी इंग्लंडच्या व्हीएचपी कंपनीबरोबर करार केला आहे. त्यामुळे प्रत्येक तिसर्या दिवशी खेळाडूना आरटीपीसीआर टेस्टला सामोरे जावे लागणार आहे आणि कुणामध्ये करोना लक्षणे दिसली तर सात दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. चार मेडिकल तज्ञाची टीम यासाठी नेमली गेली असून त्यात बीसीसीआयचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत साळवी यांचाही समावेश आहे. आयसीसीने खेळाडूना एकटेपणा जाणवू नये म्हणून गर्लफ्रेंड, कुटुंब सदस्यांना त्यांच्यासोबत राहता येईल अशी सुविधा दिली आहे असेही समजते.