कल्याणच्या कारागृहात पुन्हा कोरोनाचा शिरकाव; 20 कैदी आढळले संक्रमित

कल्याण,

गेल्या जवळपास पावणे दोन वर्षांपासून महाराष्ट्रासह देशात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. तुरुंगातील कैदी देखील कोरोना विषाणूपासून वाचू शकले नाही. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक भारतीय तुरुंग प्रशासनाने अनेक कैद्यांची तुरुंगातून सुटका केली होती. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर, संबंधित कैद्यांना पुन्हा बोलावून घेतलं आहे. दरम्यान कल्याण येथील आधारवाडी कारागृहातदेखील कोरोना विषाणूचं संक्रमण आढळलं होतं. यानंतर आता पुन्हा एकदा याच कारागृहात कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे.

महाराष्ट्राच्या कल्याण येथील आधारवाडी कारागृहात 20 कैदी कोविड बाधित आढळल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती देताना तुरुंग अधिकार्‍यांनी सांगितलं की, सर्व कोरोना बाधित रुग्णांना ठाण्यातील कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याआधी एप्रिल 2021 मध्येही आधारवाडी कारागृहात 30 कैदी कोरोना संक्रमित आढळले होते.

दुसरीकडे, महाराष्ट्रात रविवारी कोरोना विषाणू संक्रमित 1715 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता राज्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 65,91,69 वर पोहोचला आहे. शिवाय रविवारी राज्यात एकूण 29 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे राज्यात मृतांचा आकडा 1,39,789 वर गेला आहे. आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 2680 रुग्ण संसर्गातून बरे झाले असून कोरोनामुक्त होणार्‍या रुग्णांची संख्या 64,19,678 वर पोहोचली आहे.

राज्यात कोरोना मुक्तीचा दर 97.39 टक्के इतका आहे, तर मृत्यू दर 2.12 टक्के एवढा आहे. रविवारी राज्यात एकूण 1,10,465 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. आतापर्यंत राज्यात एकूण 6,10,20,463 जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात सध्या 28,631 सक्रिय रुग्ण आहेत. तर ठाण्यात रविवारी एकूण 182 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. निर्बंध शिथिल केल्यानंतर, राज्यात अनेक जिल्ह्यांत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांत वाढ झाली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!