टेकाडी सर्कलमधील विकासकामांचे मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते भूमिपूजन
नागपूर, दि. 19 :
जिल्हा परिषदेच्या टेकाडी सर्कलअंतर्गत येणाऱ्या जुनी कामठी, कांद्री आणि टेकाडी या ग्रामपंचायतींमधील विविध विकासकामांचे भूमिपूजन पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते आज झाले.
जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती रश्मी बर्वे, पारशिवनी पंचायत समिती सभापती मीना कावळे, उपसभापती चेतन देशमुख, माजी आमदार एस. क्यू. जामा, पंचायत समिती सदस्य करुणा भोवते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकार आणि सरपंच यावेळी उपस्थित होते.
कोविड काळात नागपूर जिल्हा परिषेदेने उत्तम काम केल्यामुळे त्यावर वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करता आल्या. आता कोविड प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाली असून संसर्ग आटोक्यात आल्याने विकासकामांना गती देण्यात आल्याचे श्री. केदार यांनी सांगितले. यामध्ये जल जीवन मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागात नवीन नळजोडणी करुन प्रत्येकाच्या घरी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. स्थानिक युवकांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्याविषयी वेकोलिच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे श्री. केदार यावेळी म्हणाले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती रश्मी बर्वे यांनी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात उत्तम काम करण्याची संधी मिळत असून, या संधीतून नागपूर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. श्री. केदार यांच्या सहकार्याने जिल्ह्यात जिल्हा परिषदेकडून विविध विकासकामे सुरु आहेत. कोविड काळात पारशिवनी तालुक्यात वेळीच विलगीकरण केंद्र सुरु केल्यामुळे अनेक ग्रामीण नागरिकांचे जीव वाचवता आल्याचे सांगून खनिज विकास निधीतून 11 रुग्णवाहिका मिळवून दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कांद्री कन्हान येथे गांधी चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नागरी सुविधा योजना, जनसुविधा योजना, आरोग्य देखभाल दुरुस्ती योजना, वस्ती सुधार योजना, रमाई आवास योजना, ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम, रस्ते विस्तारीकरण, पाणंद रस्तेनिर्मिती, सिमेंट रस्ते बांधकाम, सामाजिक सभागृह बांधकाम, रस्ता खडीकरण, सामाजिक स्वयंपाकगृह बांधकाम, नाली बांधकाम, व्यसनमुक्ती केंद्र बांधकाम आदी एकूण 14 कोटी 50 लाख रुपये किमतीच्या विकासकामांचे भूमीपूजन आज करण्यात आले.