केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी नवी दिल्ली येथील कृषी भवनातील स्वच्छतेची तपासणी करून परिस्थितीचा आढावा घेतला
स्वच्छता ही आपल्या स्वभावात आणि आपल्या संस्कृतीमध्ये अंतर्भूत असायला हवी – केंद्रीय मंत्री तोमर यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर 2021
स्वच्छता अभियानाअंतर्गत आज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज नवी दिल्ली येथील कृषी भवनाला भेट देऊन पाहणी केली. कृषी भवनात कार्यरत सर्व मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी तेथील विविध कार्यालयांची स्वच्छता कामाचा आणि प्रलंबित कामांच्या निपटाऱ्याचा आढावा घेतला. केंद्रीय मंत्री तोमर म्हणाले, “स्वच्छता ही आपल्या स्वभावात आणि आपल्या संस्कृतीमध्ये अंतर्भूत असायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छतेविषयी जाणीव निर्माण केली आहे आणि त्याचे परिणाम देखील दिसू लागले आहेत. देशभरात स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण झालेली दिसून येत आहे.”
तोमर म्हणाले, “स्वच्छता अभियानाअंतर्गत जे लक्ष्य साध्य करण्याची अपेक्षा आपण लोकांकडून करतो ती गोष्ट आपण सर्व सरकारी इमारती आणि कार्यालयांच्या परिसरात पाळायला हवी.” जनतेच्या तक्रारी, संसदीय समस्या आणि कार्यालयांशी संबंधित इतर प्रलंबित समस्या तातडीने सोडविल्या गेल्या पाहिजेत असे आदेश त्यांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.
कृषी भवनात विशेष स्वच्छता मोहीम चालविली जात असून त्या अंतर्गत निरुपयोगी फाईल्स काढून टाकल्या जात असून हे काम यापुढेही सुरु राहणार असल्याची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली. कृषी भवनाच्या इमारतीच्या आतील तसेच बाहेरील भागात स्वच्छता राखण्यासाठी स्वच्छता अभियान विशेष लक्षपूर्वक राबविले जात आहे. 2 ऑक्टोबर पासून सुरु झालेल्या विशेष स्वच्छता अभियानाद्वारे कृषी भवनातून आतापर्यंत 4 ट्रक भरून भंगार आणि इतर सामान विल्हेवाटीसाठी पाठवून देण्यात आले आहे.