राज ठाकरेंच्या नावाखाली खंडणी! मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्याला बेड्या, मराठी अभिनेत्रीलाही नोटीस
मुंबई,
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावानं खंडणी मागणार्या टोळीला, मुंबईतल्या मालवणी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. धक्कादायक बाब म्हणजे, अटक करण्यात आलेल्यांमध्ये मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि त्यांच्या चालकाचा समावेश आहे.
अटक करणार्यात आलेल्यांमध्ये दिग्दर्शक मिलन वर्मा, निर्माता युवराज बोराडे आणि चालक सागर सोलंकर यांचा समावेश आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणी एका मराठी अभिनेत्रीला देखील नोटीस धाडली आहे. ही अभिनेत्री मनसेची कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे. आरोपींनी मढ परिरातील एका बंगल्याच्या सुरक्षारक्षकाला मारहाण केली होती आणि या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल केला. सुरक्षारक्षकानं केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, एक महिला बंगल्याच्या सुरक्षारक्षकाला मारहाण करताना दिसत आहे. मारहाण असताना ती त्याला राजसाहेबांना ओळखत नाहीस का? तू मुंबईत राहून मराठी बोलता येत नाही? काम कोणासाठी करतोस? असे अनेक प्रश्नही विचारताना दिसत आहे. व्हा मालवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सर्व आरोपींनी मढ मधील एका बंगल्यात जाऊन तेथील सुरक्षारक्षकाला मारहाण केली होती. तसेच त्या सुरक्षारक्षकाकडे पैशांचीही मागणी केली होती. एवढंच नाहीतर या आरोपींनी सुरक्षारक्षकाला मारहाण केल्यानंतर संबंधित घटनेचा व्हिडीओही व्हायरल केला होता. सदर घटनेनंतर पीडित सुरक्षारक्षकानं पोलिसांत धाव घेतली. दयानंद गोड असं तक्रारदाराचं नाव आहे. सुरक्षारक्षकानं तक्रार दाखल केल्यानंतर मालवणी पोलिसांनी आयपीसी कलम 452,385,323,504,506,34 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. तसेच, महिलेला नोटीस पाठवण्यात आली होती, परंतु ती चौकशीसाठी उपस्थित राहिली नाही, याप्रकरणी महिलेला पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली आहे.