खादी ग्रामोद्योग आयोगाने कोविड -19 महामारी असतानाही, 2020-21 आर्थिक वर्षात नोंदवली सर्वोच्च उलाढाल

नवी दिल्ली 17 JUN 2021

कोविड -19 महामारीने संपूर्ण वर्ष झाकोळले असतानाही खादी ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) आतापर्यंतची सर्वोच्च उलाढाल नोंदवली आहे. केव्हीआयसीने 2019-20 च्या 88,887 कोटी रुपयांच्या तुलनेत 7.71% वाढ नोंदवत 2020-21 या आर्थिक वर्षात, 95,741.74 कोटी रुपयांची एकूण वार्षिक उलाढाल नोंदवली.

गेल्या वर्षी 25 मार्चला देशव्यापी टाळेबंदी जाहीर झाल्यावर 3 महिने उत्पादन बंदच होते. त्या पार्श्वभूमीवर केव्हीआयसीच्या 2020-21 मधील विक्रमी कामगिरीचे महत्व मोठे आहे.  या काळात खादी उत्पादनाचे सर्व एकक आणि विक्रीची दुकाने बंद होती, त्यामुळे उत्पादन आणि विक्रीला मोठा फटका बसला. मात्र, पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत आणि व्होकल फॉर लोकल या नाऱ्याने उभारी घेत केव्हीआयसी झपाटून कामाला लागली. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या अभिनव विपणन संकल्पनांनी केव्हीआयसी उत्पादनांमध्ये वैविध्य आणले, स्थानिक उत्पादन वाढले आणि खादीच्या विकासाचा मार्ग खुला झाला.

खादी ग्रामोद्योग क्षेत्रात वर्ष 2015-16 च्या तुलनेत वर्ष 2020-21 उत्पादनात 101% तर एकूण विक्रीत 128.66% वाढ नोंदवण्यात आली.

खादी ई-पोर्टल, खादीचे मास्क, खादीची पादत्राणे, खादीचे नैसर्गिक रंग, खादी हँड सॅनिटायजर, इत्यादीं नवे उपक्रम, नवीन पीएमईजीपी एकक, नवीन स्फुर्ती समूह यांची विक्रमी नोंद, सरकारचे स्वदेशीसाठीचे पाठबळ आणि केव्हीआयसीचा निमलष्करी दलांबरोबरचा पुरवठ्याचा करार यामुळे महामारीच्या काळातही ग्रामोद्योग क्षेत्रातल्या उलाढालीत वाढ झाली.

उत्पादनात, आर्थिक वर्ष 2019-20 मधील 65,393.40 कोटी रुपयांच्या तुलनेत 2020-21 मधे 70,329.67 कोटी रुपये वाढ नोंदवण्यात आली. तर विक्रीतही  2019-20 मधील 84,675.29 कोटी रुपयांच्या तुलनेत 2020-21 मधे 92,214.03 कोटी रुपये वाढ झाली.

केव्हीआयसीचा या काळात मुख्य भर कारागिर आणि बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करणे होता असे आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना यांनी सांगितले.

आर्थिक अडचणी उभ्या ठाकल्या असताना तरुणांनी मोठ्या संख्येने पीएमईजीपी अंतर्गत स्वयंरोजगार उभारले त्यामुळे ग्रामोद्योग क्षेत्रातल्या उत्पादनात वाढ झाली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!