रक्ताने अभिषेक करणार्या भोंदू बाबाला अटक, भक्ताने केला भांडाफोड
नांदेड
जिल्ह्यातील माहूरमध्ये रक्ताने अभिषेक करून अघोरी प्रयोग करणार्या एका भोंदू बाबाला पोलीसांनी जादूटोणा कायद्या अंतर्गत अटक केली आहे. विश्वजित कपीले असे अटक केलेल्या भोंदुबाबाचे नाव आहे. या भोंदुबाबाचा भांडाफोड बाबाच्या मुंबई येथील प्रविण शेरकर या भक्तानेच केला आहे. या भक्ताकडून (2013 ते 2020)पर्यंत रोख रकमेसह अनेक वस्तू असे 23 लाखाची फसवणूक बाबाने केली आहे. काल रात्री भोंदुबाबासह चार जणांविरोधात माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा भोंदुबाबा अनेक वर्षांपासून अघोरी विद्या, तंत्रमंत्राचा वापर करत भुतबाधा घालवणे, गुप्त धन काढून देणे, मटक्याचे आकडे काढून देणे, दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करत हजारो रुपये भक्ताकडून उकळत असे. हा भोंदुबाबा स्वत:ला दत्ताचा आवतार असल्याचे सांगून भक्ताकडून अघोरी पुजा करुन घेत असे.
हजारो लोकं या बाबांचे भक्त असून, हा बाबा स्वत:चीही पुजा आरती करुन आंगावर पैसे ठेवायला लावायचा. हा सर्व प्रकार अमावस्या पोर्णिमेच्या वेळेस करायचा. भोंदुबाबा हा मुळचा पुसद जिल्हा यवतमाळचा आहे. सध्या नवरात्रोत्सव असल्याने माहूर येथे त्याने आपले बस्तान मांडले आहे. दरम्यान, या प्रकरणी भोंदुबाबा विश्वजित कपीलेसह भाऊ रवी, कैलास आणि भावजय रसिका विरोधात माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.