स्वातंत्र्याच्या लढ्यात : कोकणाचे योगदान – डॉ.गणेश मुळे

अमृत महोत्सव विशेष लेख क्र. १   

देशात आणि राज्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष सुरु आहे. कोकणापुरता विचार केला तर, गेल्या 75 वर्षात कोकण विभागात स्वातंत्र्यानंतर अनेक बदल घडले. विकासाचे नवे पर्व सुरु झाले असले तरी, या स्वातंत्र्य मिळविण्याच्या प्रक्रियेत अनेक स्वातंत्र्य सेनानी यांचे योगदान मोठे होते. म्हणूनच हा लढा यशस्वी झाला हे मान्य केले पाहिजे. कृषि, उद्योग, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, सिंचन, दळणवळण सारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात कोकण विभागात मोठ्या प्रमाणावर काम उभे राहिल्याचे चित्र दिसते आहे.

परवाच सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ “चिपी”चे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भाषणाचे सूत्रच मुळात कोकणाचा सर्वांगिण विकास कसा होतो आहे आणि भविष्यात अजून कसा करता येईल हाच धागा होता. कोकणातील पायाभूत सुविधा वाढत आहेत. त्यादृष्टीने अनेक प्रकल्‍प गेल्या काही वर्षात उभे राहिले हे दृश्य स्वरुपात दिसते आहे.

समृद्ध समुद्र किनारा, हिरवेगार डोंगर, सागरी किल्ले या सोबतच देशातील उत्तम हवामान कोकणात आहे. अशा परिस्थितीत पर्यटनाच्या सोयी सुविधा मोठ्या प्रमाणावर उभारून देशी आणि विदेशी पर्यटकांसाठी नवी संधी उपलब्ध करून दिली जात आहे. पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदूर्ग देशात ओळखला जातो. रत्नागिरी जिल्ह्यात असणारे अनेक पर्यटन ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करतात. रायगड किल्ला हा महाराष्ट्राचे वैभव म्हणून ओळखले जाते. इंग्रजांविरुद्ध कोकणाने दिलेल्या लढ्याच्या या समृद्ध खुणा आहेत.

भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास पाहिला तर लक्षात येते की, रविंद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यासह अनेक मान्यवरांचे खूप मोठे योगदान आहे. धर्म निरपेक्ष लोकशाहीच्या पायावर देशाची चांगली स्थिती आहे. कोकणात स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी सहभाग प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे घेतला. आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक मार्गांनी भारतीय समाजाला जागे करण्याचा प्रयत्न केला. 19 आणि 20 मार्च 1927 ला महाड येथील चवदार तळ्यासाठी सत्याग्रह केला. स्वातंत्र्य लढ्यात तुरुंगवास भोगलेले कोकणचे गांधी म्हणून ओळख असणारे आप्पासाहेब पटवर्धन यांनी गोपूरी येथे आश्रम उभा करून एक नवा संदेश यातून दिला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देखील आप्पासाहेबांनी स्वच्छतेचे व्रत कायम ठेवले. हे विशेष होय. 1932 च्या नागपूरातील झेंडा सत्याग्रह हा प्रमाणे रत्नागिरीमध्ये त्यांनी सत्याग्रह केला. दारुबंदी, कुणबीसेवा संघ, भारत सफाई मंडळ असे अनेक नवे प्रयोग याच काळात घडले.

कोकणातील खोत परंपरा खूप जुनी आहे. डॉ.बाबासाहेब बोटे यांनी खोत कुळांची गाऱ्हाणी मांडली. शेतकरी चळवळीत त्यांचे योगदान खूप होते. धान्य परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांनी न्याय मिळवून दिला. कोकणातील प्रजासत्ताकाचा पहिला क्रांती लढा वासुदेव बळवंत फडके यांनी दिला होता.  वासुदेव बळवंत फडके यांनी स्वातंत्र्यासाठी केलेले योगदान हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. श्रीपाद डांगे, सुरेंद्रनाथ टिपणीस, ना.ना.पाटील, अनंतराव चित्रे, क्रांतिवीर बळवंत वासुदेव फडके, हु.जोशी मामलेदार, पनवेलचे बाबुराव आपटे,आप्पासाहेब वेदक, नामाजी गोपाळ मोकल, सत्याग्रही धनाजी जोमा म्हात्रे, नारायण नागू पाटील, दादासो करंदीकर, भास्कर दामले, पी.एन.धारप, दादासो रेगे, गुप्ते, तेंडूलकर, गोडबोले, नथु टेकावले, अर्जून भोई, वसंत दाते, कमलाकर दांडेकर, अण्णासाहेब सावंत, कुलाबा जिल्ह्याचे हिरवे गुरुजी, शेवनाथ नानाभाई वाडेकर, राजाभाऊ चांदोरकर, रामभाऊ साठे, नानासो कुंटे, विष्णुपंत पेंडसे, विष्णुपंत परांजपे, भास्करराव दिघे, वासुकाका पेंडसे, श्रीपाद चौधरी, बापूसाहेब गद्रे, भाई कोतवाल उर्फ विठ्ठलराव लक्ष्मणराव कोतवाल, अशी कितीतरी थोर मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रात दमदार कामगिरी करीत होते. महाडच्या स्वराज्याचा लढा देणारे नाना पुरोहित यांचेही नांव आवर्जून घ्यावे लागेल. मोहन धारिया यांनी संस्थान मुक्तीचा अहिंसात्मक लढ्यात मोठे योगदान दिले आहे.

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी असहकार आंदोलन सुरु होते. त्यात कोकण विभाग मागे नव्हता.1930-32 च्या मिठाचा कायदेभंग असो की, 1941 चा वैयक्तिक सत्याग्रह आणि निर्णायक लढा म्हणून ज्या कडे पाहिले जाते. त्या 1942 च्या “चले जाव” आंदोलनात कोकणाने राष्ट्रसाठी लढा दिला. त्याची नोंद आजही अनेक ठिकाणी आढळते. अगदी पालघर, बोर्डी, घणसोलीपासून थेट गोव्याच्या शेजारी असणाऱ्या शिरोड्यापर्यंत ही चळवळ अधिक सक्रिय पद्धतीने एकसंघ भावनेने झाली होती. या इतिहासाच्या पाऊलखूणा आजही जपल्या आहेत. एकीकडे स्वातंत्र्याची चळवळ जोर धरत असतांनाच 1942 च्या आंदोलनात शेतकऱ्यांनी घेतलेला सहभाग आणि आयोजित केलेल्या परिषदा यांचे महत्त्व अनन्य साधारण असे आहे. पंधरा पोलीस त्या काळात आडवे करण्यात यश आले होते. ना.ना.पाटील यांनी खूप आठवणी पुस्तक स्वरुपात मांडल्या आहेत. भूमिगत चळवळीतही कोकणी तरूण मागे नव्हता. महात्मा गांधी ते लोकमान्य टिळक या परंपरेप्रमाणे कोकणात स्वातंत्र्य चळवळीत सर्व स्तरावरील लोक सहभागी झाले होते हे विशेष होय! स्वातंत्र्य चळवळीत कोकणचे योगदान केवळ एका लेखात समाविष्ट होणारे नाही, म्हणून हा लेख म्हणजे एक सुरुवात आहे. अमृत वर्षाच्या निमित्ताने याच विषयावर अधिकाधिक माहिती लेखाद्वारे देण्याचा आमचा प्रयत्न आहे, नव्या पिढीकडून स्वागत होईल ही अपेक्षा.

– डॉ.गणेश मुळे

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!