बुलडाणा जिल्ह्यातील क्रीडा संकुलांच्या प्रलंबित कामांकरिता निधी उपलब्ध करून देणार – क्रीडामंत्री सुनील केदार

मुंबई, दि. 13 :

बुलडाणा जिल्हा क्रीडा संकुल आणि तालुका क्रीडा संकुलांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत बुलडाणा जिल्ह्यातील क्रीडा संकुलांच्या विविध प्रलंबित कामांसंदर्भात मंत्रालयात क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी श्री.केदार बोलत होते.

क्रीडामंत्री श्री.केदार म्हणाले, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा येथील तालुका क्रीडा संकुलांचे अद्ययावतीकरण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झालेला असून सिंदखेड राजा येथे प्रथम वर्षाकरिता कबड्डी, खो-खो आणि प्रसाधन गृहसहित तसेच देऊळगाव राजा येथे बहुउद्देशीय हॉल याकामांकरिता निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मानधनावरील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मानधन वितरीत करण्यात येणार आहे. तसेच मानधनावरील कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवून देण्याकरिता प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यासंदर्भात लवकरच मंजुरी कार्यवाही करण्यात येईल.

अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी नमूद केलेली बुलडाणा जिल्ह्यातील क्रीडा संकुलसंबंधित विविध प्रलंबित कामे करण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून, ही कामे गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करून घ्यावी, असे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी निर्देश दिले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!