धामोडी येथील मानसी पाटील उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला रवाना..

धामोडी प्रतिनिधी – ( राहुल जैन )

कु. मानसी मनोहर पाटील
हिचे शालेय शिक्षण ठाणे आणि चिपळूण, जि. रत्नागिरी येथे झाले.
इ. सातवीत असतानाच सिंधु नदीकाठावरील हडप्पा मोहेंजोदारो येथील नागर संस्कृती आणि अद्याप न उलगडलेली चित्रलिपी याचे आकर्षण तिला वाटले. यातूनच इतिहास विषयाची आवड निर्माण झाली. इ.10वी एस.एस.सी. बोर्डात 95% गुण मिळवूनही, डाॅक्टर, इंजिनिअर ही मळलेली वाट सोडून ख्यातनाम सेंट झेवियर्स कॉलेज येथे कला शाखेत प्रवेश घेतला. इ. बारावीत 87% गुण मिळवून, ‘प्राचीन भारतीय संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र’ या विषयात डिस्टिंक्शन सह पदवी संपादन केली. ग्रेट ब्रिटन येथील डरहॅम युनिवर्सिटी, क्यू.एस. वर्ल्ड रॅकिंग नुसार आर्किऑलॉजी विषयासाठी ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज खालोखाल चौथ्या क्रमांकावर आहे. तिथे मास्टर्स इन फिल्ड आर्किओलाॅजी या पदव्युत्तर पदवी साठी प्रवेश संपादन करण्यात मानसी हिने यश मिळवले आहे.
इजिप्त आणि आशिया या भागाचा विशेष अभ्यास तिच्या एम.ए. अभ्यासक्रमात समाविष्ट आहे.
मौजे धामोडी ता. रावेर येथील सेवानिवृत्त ग्रामसेवक श्री. सोपान नामदेव पाटील व सुशीलाबाई यांची कु.मानसी ही नात आहे. तिचे वडील श्री. मनोहर सोपान पाटील लुब्रिझाॅल इंडिया प्रायव्हेट. लि. या बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये सहा.महाव्यवस्थापक आहेत, आणि आई सौ. वृषाली पाटील तहसिलदार म्हणून कार्यरत आहेत. पणजी गं.भा. सुंदरबाई केशवराव देशमुख ( घोडसगाव, मु.नगर), आजोबा श्री.वसंत वामन चौधरी( से.नि. उपसचिव, मंत्रालय, मानेगाव, मु.नगर) आणि आजी सौ. उषा वसंतराव चौधरी( से.नि. सहा. व्यवस्थापक, एम.एस.ई.बी.प्रकाशगड) व धामोडीकर आजी आजोबा यांचा भक्कम पाठिंबा आणि प्रेमळ सहवास यामुळेच हे यश मिळवू शकले असे कु. मानसी हिने सांगितले आहे.
ती 8 ऑक्टोबर रोजी इंग्लंड ला रवाना झाली. पुढे या विषयातच पी. एच. डी. मिळवण्याचा तिचा मनोदय आहे. तिच्या यशाचं कौतुक व पुढील वाटचालीस शुभेच्छा ग्रामपंचायत सरपंच धामोडी ताईबाई कोळी, सदस्या स्विटी पाटील, मनिषा पाटील, अर्चना पाटील, कल्पना पाटील, आशाबाई पाटील,दिपक जैन यांनी दिल्या .

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!