पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते लाभार्थ्यांना नमुना ८ हस्तांतरणनांदेड जिल्ह्यातून सहभागी

नांदेड जिल्ह्यातून सहभागी घरकुल लाभधारकांनी शासनाप्रती व्यक्त केली कृतज्ञता

नांदेड , दि. 15 :- महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत नांदेड जिल्ह्याने घरकुल योजनेचे निर्धारित वेळेत उद्दिष्ट साध्य केले. आज राज्यातील एकत्रित “ई-गृहप्रवेश” कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातही पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात घरकुल लाभधारकांना घरकुलाच्या चाव्या व नमुना 8 प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. देगलूर तालुक्यातील खानापूर येथे एका छोटेखानी समारंभात याचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार मोहन हंबर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या या आव्हानाशी सामना करत विक्रमी काळात एकूण 5 हजार 126 घरकुले पूर्ण केली. यात प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण, रमाई आवास योजना ग्रामीण, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजनेंतर्गत घरकुलांचा समावेश आहे. 20 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या अल्प कालावधीत ही घरकुले पूर्ण करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याच्या “ई-गृहप्रवेश” या समारंभात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मान्यवर यांच्याशी संवाद साधण्यासाठी जिल्ह्यातील प्रातिनिधीक 8 लाभार्थी उपस्थित होते. यात व्यंकटी गुडमवार, लक्ष्मण बोकारे, चंपती पोहरे, कल्पना पाटोळे, संभाजी देशमुख, शंकर इंगोले, चिमनाजी शेके, शंकर आत्राम या लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी चाव्या हस्तांतरीत केल्या.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!