काल दिवसभरात देशात 19 हजार 740 कोरोनाबाधितांची नोंदनवी दिल्ली
नवी दिल्ली
देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा आलेख काहीसा घसरताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल दिवसभरात 19 हजार 740 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर देशातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्याही घसरली आहे. सध्या देशात दोन लाख 36 हजार 643 एवढी अॅक्टिव्ह संख्या आहे. गेल्या सात महिन्यातील ही सर्वात कमी सक्रिय रुग्णसंख्या आहे. तसेच देशात आतापर्यंत कोरोना लसीचे जवळपास 94 कोटी डोस देण्यात आले आहेत. तसेच सध्या 8.51 कोटी डोस शिल्लक आहेत.
दरम्यान महाराष्ट्रातील आठ कोटी 51 लाख 99 हजार 386 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत. यात पाच कोटी 94 लाख 64 हजार 201 जणांनी पहिला तर दोन कोटी 57 लाख 35 हजार 167 जणांनी दुसरा डोस घेतला. सध्या वेगाने लसीकरण सुरू असून राज्य सरकारचा नोव्हेंबर अखेरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाच्या दुसर्या लाटेचा प्रभाव आता कमी होताना दिसत आहे. सध्या शहरी भागात तुलनेने ग-ामीण भागात जास्त प्रमाणात रुग्ण आढळत असून विदर्भात काही जिल्ह्यात तर एकाही रुग्णांची नोंद आज झाली नाही. मराठवाड्यातही रुग्णसंख्या कमी झाली आहे. सध्या उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि पुणे, मुंबई आणि उपनगरांत जास्त रुग्ण आढळत आहेत.
राज्यातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीत घट पाहायला मिळत आहे. राज्यात काल दिवसभरात दोन हजार 620 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दोन हजार 943 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत राज्यात 63 लाख 97 हजार 018 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के आहे. दरम्यान, राज्यात काल 59 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला.