पंतप्रधानांच्या हस्ते 11 ऑक्टोबर रोजी भारतीय अंतराळ संघटनेचे उद्घाटन

नवी दिल्ली 09 OCT 2021

पंतप्रधान  नरेंद्र मोदी 11 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इंडियन स्पेस असोसिएशन (ISPA) या भारतीय अंतराळ संघटनेचे उदघाटन करणार आहेत.  या महत्त्वाच्या प्रसंगी ते अंतराळ उद्योगाच्या प्रतिनिधींशीही  संवाद साधतील.

भारतीय अंतराळ संघटनेविषयी  (ISpA) माहिती

इंडियन स्पेस असोसिएशन (ISpA ) ही अंतराळ आणि उपग्रह कंपन्यांची प्रमुख औद्योगिक संघटना असेल, जी भारतीय अंतराळ उद्योग कंपन्यांचा सामूहिक आवाज असेल. ही संस्था उद्योगांना धोरणात्मक समर्थन देईल आणि सरकार आणि त्याच्या एजन्सीसह भारतीय अंतराळ क्षेत्रातील सर्व हितधारकांशी देखील ही संघटना समन्वय साधेल. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेच्या अनुषंगाने भारताला स्वयंपूर्ण ,तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि अंतराळ क्षेत्रातील आघाडीचा देश बनवण्यात, भारतीय अंतराळ संघटना मदत करेल.

अंतराळ आणि उपग्रह तंत्रज्ञानामध्ये प्रगत क्षमता असलेल्या देशी आणि विदेशी कंपन्यांचे भारतीय अंतराळ संघटनेद्वारे प्रतिनिधित्व केले जाते. त्याच्या संस्थापक सदस्यांमध्ये लार्सन अँड टुब्रो, नेल्को (टाटा ग्रुप), वनवेब, भारती एअरटेल, मॅपमायइंडिया, वालचंदनगर इंडस्ट्रीज आणि अनंत टेक्नॉलॉजी लिमिटेड यांचा समावेश आहे. इतर मुख्य सदस्यांमध्ये गोदरेज, ह्यूजेस इंडिया, अझिस्टा-बीएसटी एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड, बीईएल, सेंटम इलेक्ट्रॉनिक्स, मॅक्सर इंडिया यांचा समावेश आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!