रणजीत सिंहच्या हत्या प्रकरणात डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीम सिंह दोषी
पंचकुला,
डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंहच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. न्यायालयाने बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगणार्या राम रहीमला आणखी एका प्रकरणात दोषी ठरवले आहे. राम रहीम आणि इतर पाच आरोपींना रणजीत सिंहच्या हत्येसाठी दोषी ठरवण्यात आले आहे. 2002 मध्ये रणजीत सिंहची हत्या करण्यात आली होती. डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमचा मृत रणजीत सिंह हा समर्थक होता आणि त्याची 10 जुलै 2002 रोजी हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सीबीआयने 3 डिसेंबर 2003 रोजी रणजीत सिंह हत्या प्रकरणात एफआयआर नोंदवला होता. तर, रणजीत सिंहचा मुलगा जगसीर सिंह याने न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती.
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने या आठवड्याच्या सुरुवातीला, गुरमीत राम रहीम सिंग यांच्याविरोधातील खुनाचा खटला पंचकुलाच्या सीबीआय न्यायालयातून इतर कोणत्याही सीबीआय न्यायालयात हस्तांतरित करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. आता पंचकुलाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने गुरमीत राम रहीम सिंग आणि इतर पाच आरोपींना आयपीसीच्या कलम 302 अंतर्गत हत्येचे दोषी ठरवले आहे. आता 12 ऑॅक्टोबरला याप्रकरणी शिक्षा सुनावली जाणार आहे.
सध्या हरियाणामधील रोहतक जिल्ह्यातील सुनारिया तुरुंगामध्ये डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह कैद आहे. गुरुमीत राम रहिमला 2018 साली दोन साध्वींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून तो सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे.