चित्रपट उद्योगात व्यवसाय सुलभता आणण्यासाठी सरकार वचनबद्ध, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांचे प्रतिपादन

मुंबई,

चित्रपट उद्योगात व्यवसाय सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी केले आहे. ते आज चेन्नई येथे साऊथ इंडियन फिल्म चेंबर ऑॅफ कॉमर्सच्या अधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीत बोलत होते.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एक पोर्टल सुरु केले आहे. तिथे विविध विभागांमधून चित्रिकरणाच्या परवानगीसाठी अर्ज करता येईल. यामुळे निर्मात्यांना भारतात कोठेही ऑॅनलाईन चित्रीकरण करण्याची परवानगी मिळेल, परिणामी व्यवसाय सुलभता सुनिश्चित होईल. अ‍ॅनिमेशन आणि व्हीएफएक्ससाठी जागतिक दर्जाची शिक्षण संस्था स्थापन करण्याकरता आयआयटी, मुंबईसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे असेही ते म्हणाले.

विविध संघटनांच्या नेत्यांकडून निवेदन आणि विनंती अर्ज मिळाल्यानंतर सरकार चित्रपट उद्योगाच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले. दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगाची काशी समजल्या जाणार्‍या एसआयएफसीसीमध्ये विविध संघटनांच्या प्रतिनिधींना भेटणे हा एक विशेष आनंदाचा क्षण असल्याचे ते म्हणाले. विचारांच्या देवाणघेवाणीसाठी आगामी गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उपस्थित राहण्याची विनंती त्यांनी सर्व सदस्यांना केली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!