कोविडनंतरच्या काळातील जागतिक व्यवस्था भारताला नवीन संधी देत आहे : यूएसआयबीसीच्या इंडिया आयडिया शिखर परिषदेत माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2021
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर (यूएसआयबीसी) अमेरिका -भारत व्यापार परिषद द्वारा आयोजित इंडिया आयडिया शिखर परिषदेला उपस्थित राहिले आणि त्यांना उत्पादन अर्थव्यवस्था निर्माण करण्याबाबत विचार मांडले.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला चंद्रशेखर यांनी सध्या भारतात सुरू असलेल्या जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान आधारित लसीकरण कार्यक्रमाच्या (कोविड -19) प्रगतीचा उल्लेख केला. 93 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आल्याचे अधोरेखित करत ते म्हणाले की डिसेंबरपर्यंत 1.3 अब्ज लोकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य लवकरच साध्य केले जाईल.
त्यांनी या लसीकरण कार्यक्रमाच्या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला दिले. आतापर्यंतची सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यावर त्यांनी भर दिला. कोवीन सारख्या मंचाच्या जलद विकासाने या मोहिमेला केवळ एक मजबूत कणाच प्रदान केला नाही तर लोकांना सक्षम करण्याचे साधन म्हणूनही काम केले . आता विविध सरकारे त्याचा वापर करण्यासाठी उत्सुक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वेगाने उदयाला येत असलेल्या नवभारताचे हे प्रतीक आहे असे ते म्हणाले.
डिजिटल अर्थव्यवस्थेवरील कोविड महामारीच्या प्रभावाबद्दल आणि पुढील रुपरेषेबाबत बोलताना चंद्रशेखर यांनी सांगितले की “आता नवीन विश्वासू जागतिक मूल्य साखळीकडे जगाचे लक्ष असून कोविडनंतरच्या काळातील जागतिक व्यवस्था भारताला नवीन संधी देत आहे ”. भारतातील तंत्रज्ञान उद्योगासाठी हा एक “Y2K सारखा क्षण” आहे , एक आमूलाग्र बदलाचा टप्पा आहे असे ते म्हणाले.