मंत्री नवाब मलिक यांच्या गंभीर आरोपांनंतर एनसीबीची पत्रकार परिषद; म्हणाले..
मुंबई,
मुंबईहून गोव्याला जाणार्या क्रूझवर ड्रग्ज पार्टी केल्याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईवर राष्ट्रवादी काँग-ेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. ही कारवाई बनावट असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबी कार्यालयात घेऊन जाणार्या व्यक्ती भाजप कार्यकर्ते मनिष भानुशाली आणि के. पी गोसावी असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. या खळबळजनक आरोपानंतर एनसीबीने पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
एनसीबीचे अधिकारी काय म्हणाले?
आम्ही केलेली सर्व कारवाई कायदेशीर असून नवाब मलिक यांचे आरोप तथ्यहिन असल्याचं स्पष्टीकरण एनसीबीनं दिलं आहे. मनिष भानुशाली आणि के. पी गोसावी यांनी कारवाईमध्ये मदत केल्याची माहिती एनसीबीनं दिली आहे. या प्रकरणात ते साक्षीदार असल्याचे ते म्हणाले. एनसीबी अधिकारी म्हणाले, की आम्हाला सूचना मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रूझवर छापा मारण्यात आला. यात आठ जणांना ताब्यात घेतलं. ही सर्व लोकं घटनास्थळी मिळाली. यांच्याकडून मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे ड्रग्ज मिळाले. यातील मोहक जयस्वालच्या माहितीनंतर जोगेश्वरीत छापा टाकला. यावेळी अब्दुल कादिर शेख नावाच्या व्यक्तीला ड्रग्जसोबत पडकण्यात आले. यानंतर गोरेगावमध्ये एनसीबी टीमने रेड टाकल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, एनसीबीने अलीकडेच मुंबईहून गोव्याला जाणार्या क्रूझवर ड्रग्ज पार्टी केल्याप्रकरणी आतापर्यंत एकूण 16 जणांना अटक केली आहे. काल या प्रकरणात आणखी 4 जणांना अटक करण्यात आली असून त्यांना आज न्यायालयात दाखल केले जाणार आहे, अशी माहिती एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिली आहे.
समीर वानखेडे म्हणाले की, आम्ही आणखी चार जणांना अटक केली आहे, जे ऑॅर्गनयझर आहेत. त्यांना कोर्टात दाखल केले जाईल. जे आम्हाला सांगायचे आहे ते कोर्टात सांगितले आहे. ते आम्ही शेअर करू शकत नाही. या प्रकरणात आतापर्यंत 16 जणांना अटक केली आहे. आमच्याकडे आणखी तपासासाठी वेळ आहे, चांगला तपास केला जाईल, असं ते म्हणाले.
काय आहेत मलिक यांचे आरोप?
नवाब मलिक म्हणाले की, ‘एनसीबीने शनिवारी मुंबईतील क्रूझवर टाकलेल्या छाप्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतरांना अटक केली होती. त्या दिवशी आर्यन खानला एक व्यक्ती खेचत एनसीबीच्या ऑॅफिसमध्ये घेऊन जाताना फोटो व्हायरल होत होता. नंतर याच व्यक्तीने आर्यन खान सोबत सेल्फीही काढल्याचं व्हायरल झालं होतं. सुरुवातीला हा व्यक्ती एनसीबीचा अधिकारी असल्याचं सांगण्यात येत होतं. पण नंतर दिल्लीच्या एनसीबी कार्यालयाने हा व्यक्ती आपला अधिकारी वा कर्मचारी नसल्याचं स्पष्ट केलं.‘
या व्यक्तीचे नाव के.पी. गोसावी आहे आणि तो स्वत: प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे असं सांगतो. त्यामुळे यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा दावा नवाब मलिकांनी केला आहे.
नवाब मलिक पुढे म्हणाले की, ‘ड्रग बाळगल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीसोबत तो दुसरा व्यक्ती कोण होता हे एनसीबीने जाहीर करावं. दुसरा एक व्यक्ती, ज्याने मरुन शर्ट घातलेला होता आणि जो अरबाज मर्चंटला एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जात होता तोही व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नव्हता. त्याचं नाव मनिष भानुशाली असून तो भाजपाचा उपाध्यक्ष आहे.‘
या मनिष भानुशालीचा फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भाजपच्या अनेक मंत्री आणि नेत्यांसोबत आहेच. एनसीबीने दावा केला आहे की क्रूझवर त्यांनी छापा मारला. त्यावर मग माहिती देताना आठ ते दहा लोक असल्याचा दावा केला होता. त्यावेळी आठ लोकांना अटक केली होती. मग इतर दोन कोण होते हे एनसीबीने स्पष्ट करावे.
नवाब मलिक म्हणाले की, ‘गेल्या 36 वर्षांच्या काळात एनसीबीवर कधीही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला नाही. पण सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर एनसीबीचे कृत्य संशयास्पद आहे. त्यानंतर मुंबईत असलेल्या बॉलिवूडला ठरवून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु झाला. मुंबईतील क्रूझवर टाकलेल्या छापेमारी याच्याशीच संबंधित आहे.‘