जल जीवन अभियानाअंतर्गत, कोळसा कंपन्या गावांमध्ये घडवत आहेत आमूलाग्र परिवर्तन – नागपूरजवळच्या पाटणसावंगी गावात दररोज 2.5 लाख लिटर क्षमतेचे कोल नीर संकुल स्थापन

नवी दिल्ली/मुंबई/नागपूर- 5  ऑक्टोबर 2021

देशातल्या प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर, जल जीवन अभियानाअंतर्गत,  कोल इंडिया लिमिटेडची उपकंपनी असलेली वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL), ही कंपनी गावातल्या लोकांना खाणीतील पिण्याचे पाणी त्यांच्या दाराशी पुरवत आहे, त्याशिवाय, स्वयंसहायता बचत गटांच्या माध्यमातून, महिलांसाठी महसूल देखील निर्माण करत आहे. या प्रयत्नांतून गावकऱ्यांच्या आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन आणले जात आहे.कोल इंडिया लिमिटेडच्या इतर कोळसा कंपन्यांनी देखील खाणीतील पिण्याचे पाणी आजूबाजूच्या गावांपर्यंत पोचवण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. 

वेस्टर्न कोल फिल्ड या कंपनीने नागपूर शहरापासून, सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटणसावंगी गावात एकात्मिक जल शुद्धीकरण आणि बॉटलिंग कोल नीर संकुल स्थापन केले आहे. या संकुलाची जलशुद्धीकरण क्षमता, दररोज 2.5 लाख लिटर्स इतकी आहे. या प्रकल्पात, दर तासाला, आरओ आधारित पाच स्तरीय जल शुद्धीकरण प्रकल्पातून 10,000 लिटर्स जल शुद्ध केले जाते. तसेच, दररोज, 15,000 शुद्ध पाण्याच्या बॉटल्स तयार केल्या जातात. पाटणसावंगी जवळच्या भूमिगत कोळसा खाणीतले पाणी यासाठी वापरले जाते.

एका विशेष योजनेअंतर्गत, वेस्टर्न कोल फिल्डने पाटणसावंगी इथल्या महिला बचत गटांशी समन्वय साधला असून, त्यांच्या माध्यमातून 20 लिटर्स पाण्याचे जार आजूबाजूच्या गावातील लोकांच्या घरोघरी पोचवण्याचे काम त्यांना दिले आहे. या प्रत्येक जारची किंमत पाच रुपये इतकी असून त्यातील 3 रुपये महिला बचत गटांना दिले जातात. यामुळे, गावागावातल्या लोकांना पिण्याचे शुध्द पाणी तर मिळतेच, त्याशिवाय, गावातल्या महिलांना पैसे कमावण्याची संधीही उपलब्ध झाली आहे.

आजूबाजूच्या आठ गावांमधील सुमारे10,000 लोकांना या सुविधेचा लाभ मिळत असून, गावांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे.

त्याचप्रमाणे, कोल इंडियाच्या इतर कंपन्या, एससीसीएल आणि एनएलसीआयएल यांनीही खाणीतील अतिरिक्त पाण्याचा पुरवठा आजूबाजूच्या गावांना आणि त्यांच्या अधिकारक्षेत्रातील, घरगुती तसेच सिंचनकामांच्या वापरासाठी देण्यास सुरुवात केली आहे. कोळसा मंत्रालयाने, विविध ठिकाणच्या  खाणीतील 4,600 लाख घनमीटर अतिरिक्त पाणी, घरगुती तसेच सिंचनकामांच्या वापरासाठी देण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली असून, येत्या पाच वर्षात त्याचा लाभ, सुमारे 16.5 लाख लोकांना होण्याची अपेक्षा आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!