अफगाणिस्तानातील ’बगराम एअरबेस’वर चीन मिळवतोय ताबा, भारतासाठी धोक्याची घंटा

काबुल,

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच सत्ता आल्यानंतर चीनने अत्यंत महत्त्वाच्या बगराम एअरबेसवर ताबा मिळवायला सुरुवात केली आहे. जुलै महिन्यात अमेरिकेने अफगाणिस्नातचा ताबा सोडल्यानंतर हा एअरबेस रिकामा केला होता. त्यानंतर या भागात चिनी गुप्तहेराचीं संख्या वाढल्याचं चित्र होतं. चीनने या एअरबेसवर ताबा मिळवायला सुरू केल्याची सूत्रांची माहिती आहे. तालिबानशी हातमिळवणी करत जर चीननं बलराम एअरबेसवर ताबा मिळवला, तर ही भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

बगराम एअरबेस हा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरील महत्त्वाचा हवाई तळ आहे. या हवाई तळावर ज्याचं नियंत्रण असेल, त्याला पाकिस्तान, भारत आणि अफगाणिस्तान या तिन्ही प्रांतांवर नजर ठेवता येणार आहे. आतापर्यंत हा तळ अमेरिकेच्या ताब्यात होता. मात्र अमेरिकेनं अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर ती जागा बळकावण्याची तयारी चीन करत असल्याचं निक्की हेली यांनी म्हटलं आहे.

चीन आणि रशिया यांच्यातील शीतयुद्धाचाही याला संदर्भ असून हा एअरबेस ज्याच्या ताब्यात असेल, त्याची धोरणात्मक ताकद अधिक वाढणार असल्यामुळे चीनने हा एअरबेस ताब्यात घेण्यासाठी पावलं उचलल्याचं हेली यांचं म्हणणं आहे. चीननं जर या एअरबेसवर ताबा मिळवला, तर ती भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

अमेरिकेची जागा कोण घेणार?

अफगाणिस्तानमध्ये सरकार जरी तालिबानचं येणार असलं, तरी आशियात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चीन आणि रशिया यांच्यात स्पर्धा सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अमेरिकेच्या ताब्यात असणारे एअरबेस आपल्या अधिपत्याखाली यावेत, यासाठी हे दोन देश प्रयत्नशील आहेत. भारतानं याबाबत सावध भूमिका घेतली असून अफगाणिस्तानच्या भूमीचा भारताविरोधात वापर होणार नसल्याचं आश्वासन घेतलं आहे. या एअरबेसवर चीनला ताबा मिळवणं शक्य होतं का आणि अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यावर काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!