वसतिगृह कर्मचार्यांच्या सरकारी वेतनश्रेणीबाबत समाज कल्याण मंत्री सकारात्मक ! डॉ. राजू वाघमारे
मुंबई,
राजर्षी शाहू महाराज अनुदानित वसतिगृह योजनेतील कर्मचार्यांना सरकारी वेतनश्रेणी लागू करण्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. महाराष्ट्रात या योजनेत काम करणार्या कर्मचारी संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्यांनी काँग्रेस नेते व प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेवून सरकारी वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी केली. या मागणीचा प्रस्ताव पुन्हा एकदा राज्याच्या हायपॉवर कमिटीसमोर मांडून शासनाला पुन्हा एकदा विनंती करून या कर्मचार्यांना सरकारी वेतनश्रेणी लागू करु असे आश्वासन दिल्याची माहिती डॉ. राजू वाघमारे यांनी दिली आहे.
यासंदर्भात डॉ. राजू वाघमारे म्हणाले की, मागील आठवड्यात याच मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असता त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन संबधीत खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याबरोबर प्रथम बैठक घ्या व तिथून प्रस्ताव आल्यावर त्यावर विचार करून सकारात्मक भूमिका घेऊ असे आश्वासन दिले होते. त्यानंतर समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. या योजनेतील 8 हजार कर्मचारी 3000 ते 7000 रुपये पगारावर काम करत असून त्यांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. या कर्मचार्यांना आजच्या परिस्थितीत सरकारी वेतनश्रेणी लागू होणे खूपच गरजेचे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व समाज कल्याणमंत्री धनंजय मुंडे यांची भूमिका सकारात्मक असून लवकरच महाविकास आघाडी सरकार सकारात्मक निर्णय घेऊन या कर्मचार्यांना न्याय देईल, असा ठाम विश्वास डॉ. राजू वाघमारे यांनी व्यक्त केला.