संगणकीकृत सातबारा व ई-पीक पाहणी उपक्रम देशासाठी मार्गदर्शक ठरेल – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

पुरंदर तालुक्यातील खळद येथे राज्यस्तरीय मोफत सुधारित सातबारा वाटप शुभारंभ

पुणे, दि.2:

नागरिकांना  सहज, पारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग  सातत्याने प्रयत्नशील असून राज्य शासनाचा संगणकीकृत सातबारा व ई-पीक पाहणी उपक्रम देशासाठी मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी  केले.

पुरंदर तालुक्यातील खळद येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मोफत सुधारित सातबारा वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कृषि राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार संजय जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी विजय देशमुख, सातबारा संगणकीय राज्य समन्वयक रामदास जगताप आदी उपस्थित होते.

महसूलमंत्री श्री.थोरात म्हणाले, नागरिकांना सहज व तत्परतेने सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध आहे.  नागरिकांना नवीन स्वरुपात संगणकीय सातबारा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. आता सातबारा नव्या रुपात पाहायला मिळेल. सातबारा समजण्यासाठी अत्यंत सोपा करण्यात आला असून प्रत्येक बाब स्पष्ट करण्यात आली आहे. महसूल विभागाच्यावतीने सातबारासोबत ई- फेरफार संगणीकृत पद्धतीने उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

ई-पीक पाहणी कार्यक्रमामुळे संपूर्ण पीकांच्या नोंदी शेतकऱ्यांच्या मदतीने घेण्यात येणार आहेत.  ई-पीक पाहणीसाठी टाटा टस्ट्रचे सहकार्य महत्वपूर्ण आहे. ई- पीक पाहणी पिकाचे क्षेत्र, प्रकार, नुकसान सर्व्हेक्षण, पीक विमा यासाठीही उपयुक्त ठरणार आहे. राज्य शासनाने सुरू केलेला हा उपक्रम संपूर्ण देशात लागू करण्याची विनंती केंद्र सरकारकडे केल्याचे श्री. थोरात म्हणाले.

राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, ई-पीक पाहणी मोहिमेमुळे शेतकऱ्यांना तात्काळ माहिती उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी महसूल व कृषी विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. शेतकरी व सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून राज्य शासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. पुरंदर तालुक्याच्या विकासासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार श्री.जगताप म्हणाले, शेतीशी निगडित सातबारा हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.  प्रशासनाच्या मदतीने पाणंद रस्त्याचे जाळे निर्माण करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.

विभागीय आयुक्त श्री. राव म्हणाले, महसूल विभागाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या मदतीने सेवा उपलब्ध करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुधारित सातबारा उपलब्ध करून देण्यात येत आहे. नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नेहमीच महसूल विभाग अग्रेसर आहे.पाणंद रस्ते उपक्रम संपूर्ण पुणे विभागात प्रभावीपणे राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, ई-पीक पाहणी अॅपद्वारे शेतकऱ्यांना सहभागी करुन पिकांची नोंद करण्याची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिह्यात जवळपास १४ लाख ९५ हजार सातबारा असून त्यातील १४ लाख ८० हजार सातबारा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल करण्यात आले आहेत. उर्वरित १३ हजार सातबारा लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील. आज जिल्ह्यातील ६०० ठिकाणी डिजिटल सातबारा वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाला प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत, सरपंच कैलास कामठे, सामाजिक कार्यकर्त्या कल्पना साळुंखे, शेतकरी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

डिजिटल सातबारा वाटप

श्री. थोरात यांच्या हस्ते मधुकर रासकर, मुक्ताबाई खळदकर, रामदास कामठे, सुनीता कारभारी, चंद्रकांत कामठे, भगवान रासकर या शेतकऱ्यांना प्रतिनिधिक स्वरुपात सुधारित सातबारा वाटप करण्यात आले.

महसुलमंत्र्यासोबत शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी अॅपवर केली पिकांची नोंदणी

महसूल मंत्री श्री. थोरात यांच्यासोबत  खळद येथे प्रत्यक्ष बांधावर जावून  भगवान  रासकर या शेतकऱ्याने ई-पीक पाहणी अॅपवर पिकांची नोंदणी केली. तसेच श्री. थोरात यांनी पाणंद रस्त्याची पाहणी केली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!