राजधानीत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

नवी दिल्ली,

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती आज महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात आली. तसेच, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने ‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ या विषयावरील ख्यातनाम विचावंत तुषार गांधी यांच्या व्याख्यानाचे पुन:प्रसारण करण्यात आले.

कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त तथा सचिव डॉ. निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावार यांच्यासह उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही  प्रतिमेस पुष्पअर्पण करून आदरांजली वाहिली.

‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ विषयावरील व्याख्यानाचे पुन: प्रसारण

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 152 व्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाज माध्यमांहून महात्मा गांधी यांचे पणतू ख्यातनाम विचारवंत तुषार गांधी यांच्या व्याख्यानाचे पुन: प्रसारण करण्यात आले. श्री.तुषार गांधी यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत (ऑनलाईन) 7 एप्रिल 2021 रोजी ‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ या विषयावर 20 वे पुष्प गुंफले होते. आज परिचय केंद्राच्या तिन्ही भाषेतील ट्विटर हँडल, तिन्ही फेसबुकपेजवर या व्याख्यानाचे सकाळी 11 वाजता  पुन:प्रक्षेपण करण्यात आले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!