सिंहगड परिसर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

“माझा सिंहगड, माझा अभिमान” कार्यक्रमाचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे

किल्ले सिंहगड परिसराचा पुरातन वारसाला शोभेल आणि पर्यावरणाला अनुरुप असा विकास करण्यात येईल आणि विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

सिंहगड येथे ‘माझा सिंहगड, माझा अभिमान’ कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, आमदार भीमराव तापकीर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख  उपवनसंरक्षक  राहूल पाटील आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, पर्यटकांना सिंहगडाच्या इतिहासाविषयी माहिती मिळावी आणि पर्यटनाचा आनंदही घेता यावा हा दृष्टीकोन समोर ठेवून विकास करण्यात येईल. गडावर येणाऱ्या पर्यटकांना माहिती देण्यासाठी मराठी व हिंदी भाषा जाणणाऱ्या स्थानिकांना गाईड म्हणून वन विभागाच्या माध्यमातून  प्रशिक्षण देण्यात येईल.

राज्यासह पुणे महानगरातून सिंहगडावर येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे गडालगत वाहनांची गर्दी होते. गडाच्या पायथ्यापासून गडावर येण्यासाठी पर्यावरणपूरक इलेक्ट्रीक बस सुविधा सुरु करण्यात येईल. तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही गडावर येता यावे यासाठी रोप वे निर्मिताचा विचार सुरू आहे. सिंहगड किल्ल्यावरील विनापरवाना अतिक्रमण काढण्यात येईल. गडाच्या परिसरातील स्थानिकांना प्राधान्य देवून स्टॉल देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ

वन विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या वन्यजीव सप्ताहाचा तसेच गाईड प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ श्री.पवार यांच्या उपस्थितीत झाला. “माझा सिंहगड माझा अभियान” अंतर्गत पुणे वन विभागामार्फत विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये सेल्फी पॉईंट, गाईड ट्रेनिंग, प्लास्टिक बंदी, वन विभाग व पीएमपीएलच्या माध्यमातून ई व्हेइकल सुरु करण्यात येणार आहे. याबाबत श्री पवार यांनी समाधान व्यक्त केले.

श्री  पवार यांनी  प्रस्तावित फूड स्टॉलची जागा, हवा पॉइंट, विश्रामगृह,वन विश्रामगृह येथे भेट देवून पाहणी केली. उपवनसंरक्षक श्री. पाटील यांनी ‘माझा सिंहगड, माझा अभिमान’ कार्यक्रमाबाबत माहिती दिली

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!