राज्यातील महाविद्यालयं सुरु होणार? उदय सामंत यांनी दिली ही महत्त्वाची माहिती
मुंबई,
राज्यातील शाळा येत्या 4 ऑॅक्टोबरपासून सुरु होत आहेत. पण राज्यातील महाविद्यालयं कधी सुरु होणार याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. याबाबात आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक झाली. कॉलेज सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले टाकत आहोत, असं उदय सामंत यांनी सांगितलं. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेवून निर्णय होईल, असंही सामंत म्हणाले.
1 नोव्हेंबरपासून कॉलेज सुरु करावं असं यूजीसी आणि एआयसीटीईचं म्हणणं आहे. मात्र त्याच कालावधीमध्ये आपल्याकडे दिवाळीचा सण आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष दिवाळीनंतरच सुरु होईल अशी परिस्थिती आहे. त्यावेळी किती टक्क्यांवर महाविद्यालयं सुरु करायचा याचा विचार केला जाईल. पण कॉलेज सुरु करण्याच्या मनस्थितीत सरकार आहे असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्रात पूरपरिस्थिती आहे, त्यामुळे सीईटी परीक्षा पुन्हा घ्यावा लागत आहेत. सीईटी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पण सीईटी परीक्षा अजून पुढे गेल्या तर मात्र कॉलेज सुरु व्हायला आणखी वेळ लागणार आहे. भविष्यात एकही विदयार्थी सीईटीपासून वंचित राहणार नाही, असा फॉर्म्युला आम्ही तयार केला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिंता करण्याची गरज नाही, असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.
कॉलेज सुरु करताना पालकांच्या हमीपत्राची आवश्यकता नाही, विद्यार्थ्यांनी यायचं की नाही हे सक्तीचं असणार नाही. विद्यार्थी आणि पालकांच्या मनात अजूनही कोविडची भीती आहे. त्यामुळे सरसकट विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये यावं अशी रचना आम्ही करणार नाही. या सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल आणि त्यापद्धतीने निर्णय घेतला जाईल असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
सध्यातरी शैक्षणिक वर्ष ऑॅनलाईनंच सुरु करण्याचा विचार आहे. महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती कमी झालेली आहे, काही जिल्ह्यांमध्ये शुन्य रुग्णसंख्या आहे, अशा जिल्ह्यात कॉलेज सुरु करायची का याबाबत विचार सुरु आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे त्या ठिकाणी कॉलेज सुरु करायला हरकत नाही, पण ते करत असताना मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सशी चर्चा करुनच पुढचा निर्णय घेतला जाईल असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.