शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीचे समन्स

मुंबई,

शिवसेना खासदार भावना गवळी यांना आता ईडीने समन्स पाठवले आहेत. त्यामुळे भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना सोमवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे. दरम्यान, भावना गवळी यांचे जवळचे मानले जाणारे सईद खान यांना काल ईडीने अटक केली आहे. त्यानंतर ईडीने त्यांना समन्स पाठवले आहेत. तसेच भावना गवळी यांनी देखील ईडीमध्ये तक्रार नोंदवली आहे.

राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना सध्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भाजपकडून सातत्याने आरोप करण्यात येत आहेत. भाजपचे किरीट सोमय्या यांनी काही नेत्यांवर आरोप केले आहेत. त्यानंतर ईडीची चौकशी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग-ेसनंतर आता शिवसेना मंत्री आणि नेत्यांना ईडी चौकशीचा सामना करावा लागत आहे.

सध्या शिवसेनेचे तीन मंत्री ईडीच्या रडारवर आहेत. 100 कोटी वसुलीप्रकरणात परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. काल जवळपास सात तास चौकशी झाली आहे. तर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी को-ऑॅपरेटिव्ह बँकेत अफरातफरीचे आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. आता यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना ईडीने समन्स पाठविले आहेत. त्यामुळे आता त्या ईडीसमोर हजर होणार का, याची उत्सुकता आहे.

भावना गवळी महिला प्रतिष्ठान या ट्रस्टला कंपनीत परावर्तीत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी सईद खान या कंपनी डायरेक्टरला अटक करण्यात आली आहे. सईद खानला काल चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या कंपनीमध्ये गवळी या निर्देशक होत्या. त्यामुळे भावना गवळी यांच्याभोवती ईडीकडून ही चौकशी होणार आहे, असे सांगितले जात आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!