भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना केंद्रीय एजन्सींचे संरक्षण? यादी आम्ही देतो – जयंत पाटील
अहमदनगर,
सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या एजन्सींचे भाजपमध्ये प्रवेश केलेल्या लोकांना संरक्षण आहे का? अशा लोकांची यादी आम्ही देतो, त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार असा सवाल राष्ट्रवादी काँग-ेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अहमदनगर येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी आले असता जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. पत्रकारांनी यावेळी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील यांनी हा सवाल केला आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे आणि हे जाणीवपूर्वक सुरू असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला.
या देशात आणि राज्यात ज्यांनी खरच मनीलॉड्रिंग केले ते बाजुला राहिले आणि ज्यांच्यावर केंद्रीय एजन्सीने ठपका ठेवला, ते भाजपमध्ये गेले आहेत त्यांचे काय झाले हे एकदा ईडीने जनतेला सांगावे, असेही जयंत पाटील म्हणाले. जे आरोप एकनाथ खडसे यांच्यावर लावण्यात आले आहेत, तो मनीलॉड्रिंगचा प्रकार नाही. त्यांच्या जावयाने कर्ज काढून त्या जमीनीचा व्यवहार केला आहे.
तर दुसरीकडे हसन मुश्रीफ यांच्या बाबतीतही लोकांनी कारखान्यात पैसे जमा केले आहेत, तरीही मनीलॉड्रिंगचा प्रकार असल्याचा ठपका ठेवला गेला आहे. हे जाणूनबुजून केले जात असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. पैसे मागितल्याचा आरोप अनिल देशमुख यांच्यावरही झाला. त्यांनी पैसे घेतले नसल्याचे अधिकारी भुजबळ व संजय पाटील या अधिकार्यांनी असे स्पष्ट केले आहे, याबाबतही जयंत पाटील यांनी सांगितले.