कायरन पोलार्ड चा पंजाब विरुद्ध धमाकेदार कारनामा, अशी अष्टपैलू कामगिरी करणारा पहिलाच क्रिकेटपटू
अबुधाबी,
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 42 व्या सामन्यात मुंबईने पंजाबवर 6 विकेटसने शानदार विजय मिळवला. पंजाबने मुंबईला विजयासाठी 136 धावांचे आव्हान दिले होते. मुंबईने हे आव्हान 19 ओव्हरमध्ये 4 विकेटस गमावून पूर्ण केलं. मुंबईकडून सौरभ तिवारीने सर्वाधिक 45 धावा केल्या. हार्दिक पंड्या आणि कायरन पोलार्ड या जोडीने मुंबईला विजयापर्यंत पोहचवलं. हार्दिकने नाबाद 40 धावा केल्या. तर पोलार्डनेही नॉट आऊट 15 रन्स केल्या. यासह पोलार्डने भीमपराक्रम केला.
टी 20 क्रिकेटमध्ये ख्रिस गेलसारख्या आक्रमक खेळाडूला न जमलेल्या कारनामा पोलार्डने करुन दाखवला आहे. पोलार्ड टी 20 मध्ये असा किर्तीमान करणारा पहिलावहिला खेळाडू ठरला आहे.
पोलार्डने नक्की काय केलंय?
पोलार्डने टी 20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावा आणि 300 विकेटसचा टप्पा पूर्ण केला आहे. पोलार्डने याआधीच 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. पोलार्डला पंजाब विरुद्धच्या सामन्याआधी 300 विकेटस पूर्ण करण्यासाठी 2 विकेटसची गरज होती. पोलार्डने पंजाबच्या डावातील 7 व्या ओव्हरमध्ये ख्रिस गेल आणि कर्णधार केएल राहुलला आऊट केलं. यासह पोलार्डच्या 300 विकेटस पूर्ण झाल्या.
पोलार्ड टी 20 क्रिकेटमध्ये 300 विकेटस आणि 10 हजार धावा असा पराक्रम करणारा पहिलाच खेळाडू ठरला. पोलार्डने हा कारनामा एकूण 565 व्या टी 20 सामन्यात केला आहे. पोलार्डने हे 565 टी 20 सामने विविध संघाकडून खेळले आहेत.
फोरपेक्षा अधिक सिक्सच
पोलार्डने 565 सामन्यात 152.79 च्या स्ट्राईक रेट आणि 31.68 च्या एव्हरेजने 1 शतक आणि 56 अर्धशतकांसह 11 हजार 217 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने फोरपेक्षा सिक्सच जास्त ठोकलेत. पोलार्डने 708 फोर आणि 758 खणखणीस सिक्स ठोकले आहेत.