पर्यावरण बदलाच्या कार्यात शहरांनी पुढाकार घ्यावा – पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्रीआदित्य ठाकरे
पुणे,
मानव जीवनाच्या अस्तित्वासाठी पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक असून पर्यावरण बदलाच्या कार्यात शहरांनी पुढाकार घ्यावा आणि शहरे कार्बन न्यूट्रल करण्यासाठी दीर्घकालीन नियोजनावर भर द्यावा, असे आवाहन पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात कार्बन न्यूट्रल आणि माझी वसुंधरा अभियान 2.0 बाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पुणे महानगर विकास प्राधिकारणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, अभियान संचालक सुधाकर बोबडे, उपायुक्त प्रशांत खांडकेकर आदी उपस्थित होते.
श्री. ठाकरे म्हणाले, शहरात कार्बन उत्सजर्नाचे प्रमाण अधिक आहे. ऊर्जेचा अधिक वापरदेखील ग्रामीण भागापेक्षा शहरात अधिक होतो. त्यामुळे पर्यावरणात वेगाने बदल घडत असून दुष्काळ, अतिवृष्टीसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी पर्यावरण रक्षणाचे दीर्घकालीन नियोजन आणि ठोस कृती अपेक्षित आहे. शहरातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठीदेखील यादृष्टीने अनुकूल बदल अपेक्षित आहेत. शहरातील उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांनी वृक्ष लागवड आणि प्रदूषण कमी करण्याच्या उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा.
सौर ऊर्जेचा वापर, हरित क्षेत्र वाढविणे, जल पुनर्भरण, विघटनशील कचऱ्याचा पुर्नपयोग अशा उपक्रमांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करावी. शाळा-महाविद्यालयातून अपांरपरिक ऊर्जेच्या वापराबाबत माहिती देण्यात यावी. शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा संयत्र बसवावे. स्वच्छतेवर भर, दैनंदीन सवयीत बदल करून ऊर्जेची बचत आदी उपाययोजनांच्या माध्यमातून मोठा बदल घडवून आणता येईल. या कार्यात महिलांचा सहभागही वाढविणे गरजेचे आहे. उद्योग, स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ व्यक्ती आणि नागरिकांच्या सहभागातून पर्यावरण रक्षणाची चळवळ उभी रहाणे गरजचे आहे, असे त्यांनी सांगितले.
ग्लोबल सिटीझन कार्यशाळेत प्रतिनिधीत्व करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे सांगून श्री. ठाकरे म्हणाले, सांडपाणी व्यवस्थापन, कचऱ्याची योग्य विल्हेवाट, अपारंपरिक ऊर्जेचा वापर आदींची सांगड घालून राज्यात पर्यावरण रक्षणाची चळवळ अधिक मजबूत करता येईल. त्यासाठी पुणे विभागाने चांगली सुरूवात केली आहे. स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने चांगले उपक्रम राबविण्यात येत आहे. वसुंधरा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातही अशीच चांगली कामगिरी करण्यासाठी मिशन मोडवर काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, पर्यावरण विकासाच्या कामात अनुभवांची देवाण-घेवाण आवश्यक आहे. शाश्वत विकासाचे ध्येय समोर ठेऊन सुरू केलेले वसुंधरा अभियान राज्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. स्वयंसेवी संस्थांनी यात चांगला सहभाग नोंदविला आहे. नागरिकांमध्ये पर्यावरण रक्षणाबाबत चर्चा घडवून आणत त्याचा सहभाग वाढविण्याची गरज आहे. पुण्यातील जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी त्याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा. जिल्ह्याने पर्यावरण रक्षणासाठी सुरू केलेल्या उपक्रमांचा चांगला परिणाम होईल आणि अभियानाच्या माध्यमातून अनुकूल बदल घडवून आणता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पर्यावरण उपक्रमांबाबत पुणे जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला असून कार्बन न्यूट्रल-2030 उपक्रमासाठी जिल्ह्याने चांगला पुढाकार घेतला आहे. माझी वसुंधरा 2.0 मध्येदेखील पुणे विभागाने चांगली कामगिरी करावी, अशी अपेक्षा श्री.बनसोडे यांनी व्यक्त केली.
श्रीमती म्हैसकर म्हणाल्या, पर्यावरण बदलाच्या उपक्रमात पुढाकार घेण्याबाबत महाराष्ट्राची जागतिक स्तरावर ओळख निर्माण होत आहे. यात सातत्य ठेवण्याच्यादृष्टीने पुणे विभागाची कामगिरी महत्त्वाची आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरणाचा पर्यावरण रक्षण आणि कार्बन न्यूट्रल उपक्रमात पुढाकार महत्वाचा आहे. पुणे विभागने माझी वसुंधरा 2.0 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचे प्रयत्न करावे.
विभागीय आयुक्त श्री. राव यांनी सादरीकरणाद्वारे पुणे विभागाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. माझी वसुंधरा अभियानात विभागातील 430 स्थानिक स्वराज्य संस्था सहभागी झाल्या आहेत. प्रदूषण नियंत्रण, हरित क्षेत्र वाढविणे, ई-वाहनांचा उपयोग, 2030 पर्यंत कार्बन न्यूट्रल करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पुणे हे पर्यावरणपूरक शहर म्हणून ओळखले जावे यासाठी 2030 पर्यंत अक्षय ऊर्जेचे 90 टक्के एकत्रिकरण करण्यात येणार आहे. मुळा-मुठाच्या संगमावर जलपर्णी मुक्तीचे अभियान लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सिंहगड किल्यावर लवकरच ई-बससेवा सुरू करण्यात येणार असून पर्यावरण पूरक पर्यटनाला चालना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे आणि पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त आणि पुणे महानगर विकास प्राधिकारणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या क्षेत्रात पर्यावरण रक्षणाबाबत आणि कार्बन न्यूट्रीलीटीबाबत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. यावेळी पुणे इंटरनॅशनल सेंटरचे प्रा. अमिताव मलिक, प्रशांत किरवाणे आणि नॅशनल केमीकल लॅबरॉरेटरीजच्या अनुया निसळ यांनी मनोगत व्यक्त केले. उपयोगात आणलेल्या पीपीई किटवर प्रक्रीया करून उपयुक्त वस्तू तयार करण्याच्या एनसीएलच्या उपक्रमाचे श्री. ठाकरे यांनी कौतुक केले.
माझी वसुंधरा अभियानाच्या पहिल्या वर्षी 21 लाख 94 हजार झाडे लावण्यात आली. 1650 हरित क्षेत्रांची निर्मिती करण्यात आली आणि 237 क्षेत्रांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. 10 हजार 663 टन कंपोस्ट खत तयार करण्यात आले. 6 हजार जुन्या व 3 हजार 500 नवीन इमारतींचे रेन वॉटर हार्वेस्टींग करण्यात आले. 11 हजार दशलक्ष लिटर पाणी संवर्धन क्षमता तयार झाली. 775 जलसंस्था स्वच्छ करण्यात आल्या आणि 12 लाख एलईडी बल्ब लावण्यात आले. 736 बायोगॅस आणि 701 सोलर पंप बसविण्यात आले अशी माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीस पुणे महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीनंतर विभागीय आयुक्त परीसरात पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.