ईसीएलजीएस योजनेची कक्षा वाढवून योजनेला 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ

नवी दिल्‍ली, 29 सप्‍टेंबर 2021

केंद्र सरकारने सुरु केलेल्या ईसीएलजीएस अर्थात आपत्कालीन पत हमी योजनेने सुरुवातीपासून आतापर्यंत 1 कोटी 15 लाख सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि व्यवसायांना मदत केली आहे. कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पात्र कर्जदारांना त्यांच्या व्यवसायातील परिचालनविषयक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी तसेच त्यांचे व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी या योजनेने मदत केली आहे.

24 सप्टेंबर 2021 पर्यंत या योजनेच्या माध्यमातून 2.86 लाख कोटी रुपयांहून अधिक कर्जांना मजुरी देण्यात आली, तसेच देण्यात आलेल्या एकूण हमींपैकी 95% कर्ज हमी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या कर्जांना देण्यात आली आहे.

पात्र क्षेत्रांना आणि व्यवसायांना यापुढच्या काळात देखील असाच पाठींबा सुरु राहील याची सुनिश्चिती करण्यासाठी ही योजना सुरु ठेवण्याची मागणी विविध औद्योगिक संस्था आणि इतर भागधारकांनी सरकारकडे केली होती. कोविड-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रभावित झालेल्या विविध व्यवसायांना मदत करण्याच्या दृष्टीकोनातून, आपत्कालीन पत हमी योजनेची कालमर्यादा 31 मार्च 2022 पर्यंत वाढविण्याचा किंवा या योजनेअंतर्गत दिल्या गेलेल्या पत हमीची रक्कम साडेचार लाख कोटी होईपर्यंत, यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचसोबत, या योजनेअंतर्गत वितरणाची कालमर्यादा वाढवून 30 जून 2022 पर्यंत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रभावित झालेल्या व्यवसायांना मदत करण्याच्या दृष्टीने या योजनेत खालील बदल करण्यात आले आहेत:

  1. ईसीएलजीएस 1.0 आणि 2.0 या योजनेतील विद्यमान कर्जदार 29.02.2020 किंवा 31.03.2021 यापैकी ज्या दिवशी जास्त रक्कम असेल त्या एकूण शिल्लक कर्जाच्या 10% अतिरिक्त पत हमीसाठी पात्र असतील
  2. ईसीएलजीएस 1.0 किंवा 2.0 यापैकी कोणत्याही योजनेअंतर्गत सहाय्य न घेतलेल्या उद्योगांना 31 मार्च 2021 रोजी शिल्लक असलेल्या कर्जाच्या 30% पर्यंत पत साहाय्य घेता येईल.
  3. ईसीएलजीएस 3.0 मध्ये उल्लेखित क्षेत्रांतील ज्या व्यवसायांनी यापूर्वी ईसीएलजीएस योजनेचा लाभ घेतला नसेल त्यांना 31 मार्च 2021 रोजी शिल्लक असलेल्या त्यांच्या कर्जाच्या 40% पर्यंत पत साहाय्य घेता येईल.
  4. कालमर्यादेत बदल होऊन ती 29.02,2020 वरून 31.03.2021 झाल्यामुळे सध्या ईसीएलजीएस योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या कर्जदारांची पात्रता वाढली असेल त्यांना विहित मर्यादेत वाढीव पत सहाय्य घेता येईल.
  5. त्याप्रमाणेच, ज्या कर्जदारांनी ईसीएलजीएस योजनेचा लाभ घेतला असेल आणि त्यांचे शिल्लक कर्ज (या योजनेच्या पाठींब्याशिवायचे) 29.02.2020 पेक्षा 31.03.2021 रोजी जास्त असेल त्यांना ईसीएलजीएस 1.0,2.0 किंवा 3.0 अंतर्गत ठरवून दिलेल्या मर्यादेत वाढीव पत सहाय्य घेता येईल.

आता करण्यात आलेल्या बदलांमुळे, कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे प्रभावित झालेल्या उद्योगांना तारणमुक्त वाढीव रक्कम हातात मिळेल याची सुनिश्चिती होईल. तसेच आगामी व्यस्त, सणासुदीच्या काळासाठी सर्व ईसीएलजीएस कर्जदारांना (मुख्यतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा यात समावेश होतो) अत्यंत आवश्यक असलेला आर्थिक पाठींबा पुरविला जाईल.

यासंदर्भातील सुधारित परिचालनविषयक मार्गदर्शक सूचना राष्ट्रील पत हमी विश्वस्त कंपनी मर्या. (NCGTC) यांच्यातर्फे स्वतंत्रपणे जारी केल्या जातील.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!