देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा सक्रियतेने वापर व्हायला हवा : लोकसभा सभापती

नवी दिल्ली,

‘जागतिक पर्यटन दिन 2021’निमित्त, केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने आयोजित केलेल्या फसर्वसमावेशी विकासासाठी पर्यटनङ्ग या विषयावरील कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी बीजभाषण केले. केंद्रीय पर्यटन, संस्कृती आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी.किशन रेड्डी आणि केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते, तर जागतिक पर्यटन संघटनेचे महासचिव झुराब पोलोलिकशविली यांचा व्हिडिओ संदेश याप्रसंगी उपस्थितांसाठी प्रसारित करण्यात आला.

केंद्रीय पर्यटन सचिव अरविंद सिंग, केंद्रीय पर्यटन महासंचालक कमल वर्धन राव,संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमाचे प्रमुख अतुल बागई यांच्यासह केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे अधिकारी तसेच प्रवासी आणि आदरातिथ्य उद्योगाचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना सभापती बिर्ला म्हणाले की कोविड-पश्चात काळात भारतातील पर्यटन क्षेत्र वेगाने पुन्हा कार्यरत झाले आहे. ते पुढे म्हणाले की,वचनबद्धता आणि एकत्रित प्रयत्नांतून निश्चितपणे भारत हा जगातील सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून उदयाला येईल.

आपण ज्या प्रकारे एकत्रित प्रयत्नांतून कोविड-19 च्या आपत्तीशी लढा दिला त्याच प्रकारे आपले एकत्रित बळ आणि समन्वयीत प्रयत्न आपल्या अर्थव्यवस्थेला एका नव्या उंचीवर घेऊन जातील, असे ते म्हणाले. अर्थव्यवस्था आणि रोजगार निर्माणासाठी पर्यटन ही एक प्रेरक शक्ती आहे. म्हणून, या क्षेत्राच्या भविष्यातील विकासासाठी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे असे त्यांनी पुढे सांगितले. भारतातील, पर्यटन क्षेत्राच्या अफाट क्षमतेबद्दल बोलताना सभापती बिर्ला म्हणाले की आपला समृध्द वारसा आणि वैविध्यपूर्ण भौगोलिक प्रदेश जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत असतात. त्यांनी पर्यावरणीय, अध्यात्मिक, शैक्षणिक आणि आरोग्य पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी भारतात प्रचंड प्रमाणात क्षमता आहे असे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!