कसोटी क्रिकेटमधून मोईन अलीची निवृत्ती
नवी दिल्ली
आयपीएल 2021 च्या दुसर्या पर्वामध्ये चेन्नईचा संघ गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानी असतानाच महेंद्र सिंग धोनीच्या संघातून खेळणारा एक खेळाडू निवृत्ती घेणार असल्याची माहिती समोर आलीय. सीएसकेमधून खेळणारा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो आता इंग्लंडकडून कसोटी सामने खेळणार नाही. तो लवकरच यासंदर्भातील अधिकृत घोषणा करणार आहे. आपल्या या निर्णयाबद्दल इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुट, प्रशिक्षक क्रिस सिल्वरवूड आणि निवड समितीच्या अधिकार्यांना मोईनने माहिती दिली आहे. मोईनने हा निर्णय मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी घेतला आहे. 34 वर्षीय मोईन अलीने इंग्लंडसाठी 64 कसोटी सामने खेळले आहेत.
यासंदर्भात ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार पुढील महिन्यात होणार्या टी 20 विश्वचषक स्पर्धा आणि अॅशेस मालिकेमध्ये खेळणार्या इंग्लंडच्या संघामधील मोईन हा संभावित सदस्यांमध्ये आहे. या दोन्ही मालिकांमध्ये खेळण्यासाठी मोईनला घरापासून फार काळ दूर रहावे लागले असते. पण मोईन हा यासंदर्भात संदिग्धावस्थेत होता. म्हणूनच त्याने कसोटीमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे आता अॅशेससाठी त्याचा विचार केला जाणार नाही. अर्थात मोईन मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यास इच्छूक आहे. तसेच तो काऊंटी आणि इतर फ्रेंचायझींसाठी क्रिकेट खेळत राहणार आहे. तो प्रथम श्रेणीमधील क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे की नाही याबद्दल त्याने अद्याप आपला निर्णय जाहीर केलेला नाही.
मोईनने कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून खेळताना चांगली कामगिरी केली आहे. इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू असणार्या इयान बॉथम, पाकिस्तानचा इमरान खान आणि वेस्ट इंडिजच्या गॅरी सोबर्सपेक्षा कमी सामन्यांमध्ये दोन हजार धावा आणि 100 बळी मिळवण्याची कामगिरी त्याने केली. 64 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 195 बळी घेतले आहेत. तो इंग्लंडसाठी सर्वाधिक बळी घेणार्यांमध्ये 16 व्या स्थानी आहे. आपल्या कसोटी कारकिर्दीमध्ये तो जगातील सर्वोत्तम तीन अष्टपैलू खेळाडूंपैकी एक ठरला होता.
त्याने गोलंदाजीबरोबरच कसोटीमध्ये फलंदाजीमध्येही चांगली कामगिरी केली. त्याने कसोटीमध्ये पाच शतके झळकावली आहेत. यापैकी चार शतके तर त्याने 2016 या एकाच वर्षामध्ये झळकावली. आतापर्यंत त्याने 64 कसोटी सामन्यांमध्ये 2914 धावा केल्या असून 195 बळी घेतले आहेत. त्याने कसोटीमध्ये 14 अर्धशतकेही झळकावली आहे. त्याने कसोटीमध्ये एकदा 10 तर 5 वेळा 5 बळी घेण्याची कामगिरीही केली आहे.
आपल्या कसोटी कारकिर्दीमध्ये मोईनने अनेकदा भन्नाट कामगिरी केल्याचे पहायला मिळाले आहे. 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना त्याने चार कसोटी सामन्यांमध्ये 25 बळी घेतले होते. तर 2018-19 मध्ये या ऑॅफ स्पीनरने श्रीलंका आणि वेस्ट इंडीजविरुद्धच्या सहा कसोटी सामन्यांमध्ये 32 बळी घेतले होते. इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांपैकी केवळ डेरेक अंडरवूड आणि ग-ाम स्वान यांनीच मोईनपेक्षा 6 अधिक बळी घेतले आहेत. एका खेळीमध्ये सर्व 10 बळी घेणार्या जिम लेकरहूनही मोईनचे स्ट्राइक रेट अधिक आहे. मोईनचा स्ट्राइक रेट हा 60.70 एवढा आहे.