जिल्ह्यातील सरपंचांनी ओडीएफ प्लस गावे करण्याबाबत पुढाकार घ्यावा – पालकमंत्री सतेज पाटील

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते चित्ररथाचे उद्घाटन

कोल्हापूर :

 ग्रामस्वच्छता, लसीकरण, तंटामुक्ती गाव आदी योजनांबाबत कोल्हापूर जिल्ह्याने राज्याला दिशा दिली आहे. जिल्ह्यातील सरपंचांनी ओडीएफ प्लस (ODF Plus) म्हणजेच हागणदारीमुक्त अधिक घोषित करण्याबाबत पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

 तत्पूर्वी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद कोल्हापूरच्यावतीने तयार करण्यात आलेल्या आजादी का अमृत महोत्सव- स्वच्छता ही सेवा अभियान-2021 या ‘स्वच्छता रथाचे’ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी फित कापून उद्घाटन केले. तर पालकमंत्री सतेज पाटील यांनी हिरवा झेंडा दाखविला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात ‘स्वच्छता संवाद’ या ऑनलाईन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष जयवंत शिंपी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, निवासी उपजिल्हाधिकारी शंकर जाधव, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, शिक्षक व अर्थसमिती सभापती रसिका पाटील, महिला बाल कल्याण सभापती शिवानी भोसले आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, ग्रामपंचायतीने स्वच्छतेचे नियोजन करणे आवश्यक आहे. गावातील पारंपारिक नदी, नाले, ओढे यांची पूर्ववत रुंदी ठेवण्याबाबत तसेच येत्या 1 तारखेला ज्येष्ठ नागरिक दिन आहे. या दिनाचे औचित्य साधून संबंधित गावातील ज्येष्ठ नागरिकांचे 100 टक्के लसीकरण  कसे होईल, याबाबत सरपंचांनी ठोस नियोजन करावे. त्याचबरोबर भविष्याच्या दृष्टिने संबंधित गावातील फ्लोटिंग पॉप्युलेशनचाही  विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रियदर्शनी मोरे (प्रकल्प संचालक-जलजीवन मिशन) यांनी  केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!