दक्षता व गुणनियंत्रण मंडळ मराठवाड्यासाठी अभिमानास्पद – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

औरंगाबाद, 

प्रत्येक इमारतीत विद्युतीकरणाचे काम हे महत्त्वपूर्ण असते, विद्युत विभाग हा अत्यंत महत्त्वाचा विभाग असल्याने औरंगाबाद सारख्या शहरात व मध्यवर्ती ठिकाणी दक्षता व गुणनियंत्रण मंडळ कार्यालय होणे ही मराठवाड्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे काढले.

स्नेहनगर येथे अधीक्षक अभियंता (विद्युत) दक्षता व गुणनियंत्रण मंडळ कार्यालय, औरंगाबाद व सार्वजनिक बांधकाम उपविभाग (विद्युत) क्रमांक-2 या  नुतन कार्यालयांचा उद्घाटन सोहळ्याप्रसंगी श्री.चव्हाण हे बोलत होते.

यावेळी व्यासपिठावर आमदार संजय शिरसाठ, आमदार उदयसिंग राजपूत, आमदार प्रदीप जैस्वाल, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग मुंबईचे मुख्य अभियंता संदीप पाटील, औरंगाबाद (विद्युत) चे मुख्य अभियंता दिलीप उकर्डे, अधीक्षक अभियंता आबासाहेब चौगुले, कार्यकारी अभियंता नितीन भोसले, अनिल कुलकर्णी आदी उपस्थित होते.

मराठवाड्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे औरंगाबाद येथे विद्युत विभागाचे दक्षता व गुण नियंत्रण मंडळाचे मुख्य कार्यालय निर्माण होणे हे होय आणि म्हणूनच या कार्यालयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे गुणवत्तापूर्वक व वेळेत काम होणे अपेक्षित असल्याचे सांगून श्री.चव्हाण म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाचा विद्युत विभाग बंद करावा अशी मागणी पुर्वी होत होती. हा विभाग बंद नाही तर अधिक मजबूत करण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे आणि म्हणूनच 5 कोटीची टेंडर मर्यादा वाढवून 15 कोटीची टेंडर मर्यादा करण्यात आली आहे. त्याचबरोबर दोनशे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. या सकारात्मक भावनेतून आणि सकारात्मक वातावरणातून या कार्यालयात नक्कीच दर्जात्मक कामे होतील अशी खात्री मी बाळगतो असे सांगून श्री.चव्हाण म्हणाले की, इलेक्ट्रिकल विंग ही अत्यंत महत्वाची असल्याने वेळोवेळी इलेक्ट्रिकल ऑडिट झाले पाहिजे असे निर्देश संबंधितांना त्यांनी यावेळी दिले.

लवकरच श्रीक्षेत्र माहूर गड येथे रोप वे चे बांधकाम तसेच श्री रेणुकादेवी मंदिराकरिता फुट ओव्हर ब्रीजचे लिफ्टसह बांधकाम करणे या दोन्ही कामांसाठी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत 51.03 कोटी निधीस मंजुरी प्राप्त असुन सदरील कामाकरिता वॅपकॉस लिमिटेड (केंद्र शासन अंगिकृत उपक्रम) यांची प्रकल्प कार्यान्वीत यंत्रणा करण्याकरिता दिपांक अग्रवाल व मुख्य अभियंता दिलीप उकर्डे यांनी MOU वर स्वाक्षरी देखील यावेळी करण्यात आली.

यावेळी श्री.चव्हाण यांच्या हस्ते दक्षता व गुण नियंत्रण मंडळाचे अधीक्षक अभियंता आबासाहेब चौगुले, उपअभियंता अजय काळे यांचा पदभार स्वीकारल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

मिलकॉर्नर ते औरंगाबाद लेणी रस्त्याचे भूमिपूजन श्री.चव्हाण यांच्या हस्ते संपन्न

औरंगाबाद‍ जिल्ह्यातील केंद्रीय मार्ग निधी योजने अंतर्गत मिलकॉर्नर ते औरंगाबाद लेणी रस्त्याचे रुंदीकरणासह काँक्रीटीकरण कामाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

सदरील रस्ता हा दिड किलोमिटरचा असून साधारण 5 कोटी इतका निधी या रस्त्यासाठी देण्यात आला आहे. औरंगाबाद शहरातील रस्त्यांकरीता 320 कोटी रुपयांच्या निधीपैकी 290 कोटी इतका निधी ही बीड बायपास रस्ता तसेच केंब्रिज ते सावंगी आदी कामे या निधीतून करण्यात येणार असून डिसेंबर-2022 पर्यंत सर्व कामे पूर्ण करु असा विश्वास मुख्य अभियंता श्री.उकर्डे यांनी यावेळी दिला.

या कार्यक्रमास आमदार प्रदीप जैस्वाल, माजी आमदार  कल्याण काळे, नामदेव पवार यांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!