शस्त्रक्रियेनंतर बरं वाटेपर्यंत घरीच नजरकैदेत ठेवा; सचिन वाझेचा न्यायालयात अर्ज
मुंबई
मुकेश अंबानी यांच्या अँटालिया या घराबाहेरील स्फोटकं आणि मनसूख हिरेन प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सचिन वाझेनं सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात नव्यानं अर्ज दाखल केला आहे. ओपन हार्ट सर्जरी झाल्यानंतर पूर्णपणे बरं वाटेपर्यंत आपल्याला घरातच नजरकैदेत ठेण्यात यावं, अशी मागणी वाझेनं या अर्जातून कोर्टाकडे केली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणा ला त्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
अँटालियाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे सहाय्यक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरीक्षक सुनील माने यांना एनआयएकडून अटक करण्यात आली आहे. तळोजा कारागृहात असलेल्या वाझेला हार्टचा त्रास असल्यानं 30 ऑॅगस्टला भिवंडी येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथं प्राथमिक वैद्यकीय उपचार केल्यानंतर त्यांच्यावर ओपन हार्ट शस्त्रक्रिया करण्याची गरज निर्माण झाल्यानं मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट रुणालयात वाझेवर 14 सप्टेंबर रोजी ही शस्त्रक्रिया पार पडली.
त्यानंतर आता वाझेनं मुंबई सत्र न्यायालयात आपल्या वकिलांमार्फत अर्ज दाखल केला आहे. नुकतीच आपल्यावर एक मोठी शस्त्रक्रिया पार पडली असून त्यातून पूर्णपणे बरे होईपर्यंत आपल्याला घरातच नजरकैदेत ठेवावं अशी विनंती या अर्जातून करण्यात आली आहे. त्याची दखल घेत न्यायालयानं एनआयएला त्यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी 27 सप्टेंबर रोजी निश्चित केली आहे.