मोदींचे नवे ‘इंडिया वन’ विमान असे आहे खास
नवी दिल्ली
बुधवारी रात्री पंतप्रधान मोदी अमेरिका दौर्यावर रवाना झाले त्यावेळी प्रथमच मध्ये फ्रांकफुर्टला न थांबता थेट वॉशिंग्टनला गेले. मोदींनी शेअर केलेल्या फोटो मध्ये विमानात ते फायली चाळताना दिसले. पंतप्रधानांचे हे नवे विमान खास असून अमेरिका आणि रशियाच्या अध्यक्षांच्या विमानाप्रमाणेचे ते वेगळे आहे. अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा आणि संचार प्रणालीने युक्त असे हे विमान अतिशय आरामदायी आहे. ‘इंडिया वन’ असे त्याचे नामकरण केले गेले असून या विमानातून मोदी यांचा हा दुसरा आणि अमेरिकेचा पहिला प्रवास आहे.
मार्च 2021 मध्ये याच विमानातून पंतप्रधान मोदी बांग्लादेशला गेले होते. बोईंग 777 मॉडेलचे हे विमान गेल्या ऑॅक्टोबर मध्ये डिलीव्हर केले गेले आहे. अशी दोन विमाने देशाने बोईंग कडून खरेदी केली आहेत. या विमानाला दोन इंजिन असून ती अत्यंत पॉवरफुल आहेत. विमानाचे इंटिरीअर खास भारतीय पद्धतीने करवून घेतले गेले आहे. विमानावर अशोक चक्र अंकित आहे आणि एका बाजूला हिंदी मध्ये भारत आणि इंडिया अशी अक्षरे आहेत.
पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती अश्या व्यक्ती हे विमान वापरू शकतात. भारतीय हवाई दलाचे पायलट हे विमान चालवितात. एकदा इंधन भरले की विमान 17 तास सलग उड्डाण करू शकतेच पण मध्येच कुठेही इंधन गरज पडली तर हवेतल्या हवेत इंधन भरता येते. कोणत्याही हल्ल्यापासून विमान सुरक्षित राहू शकते. शत्रूच्या मिसाईलची दिशा बदलणे आणि वेळ पडल्यास आक्रमण करता येईल अशी व्यवस्था यात केली गेली आहे. शत्रूच्या रडारला हे विमान जॅम करू शकते.
विमानात कॉन्फरस रूम, शयन कक्ष, व्हीव्हीआयपी प्रवासी कक्ष, मेडिकल सेंटर सुविधा आहे. यापूर्वी एअर इंडिया 747 जम्बो जेटचा वापर अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी केला जात होता. नवीन विमान एकाद्या मजबूत किल्ल्याप्रमाणे अभेद असल्याचे सांगितले जाते.