भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राने साजरा केला ‘सांकेतिक भाषा दिन’ दिव्यांग व्यक्ती मनुष्यबळाचा अविभाज्य भाग : केंद्रीय मंत्री डॉ वीरेंद्र कुमार
नवी दिल्ली
सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाअंतर्गत दिव्यांगजन सबलीकरण विभागाच्या भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र या स्वायत्त संस्थेने आज नवी दिल्लीत डॉ आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात ‘सांकेतिक भाषा दिन’ साजरा केला. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तर सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्य मंत्री प्रतिमा भौमिक आणि ए नारायणस्वामी कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
केंद्र सरकारने यावेळी, भारतीय सांकेतिक भाषेचा प्रवास उलगडणारा माहितीपट सदर केला. चौथ्या भारतीय भाषा स्पर्धा 2021 च्या विजेत्यांची नावे यावेळी जाहीर करण्यात आली. श्रवण विकलांग मुलांसाठी राष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा घेण्य्यात आली होती. यावेळी सामाजिक न्याय मंत्र्यांनी 5 विजेत्यांशी संवाद साधला. भारतीय सांकेतिक भाषांमध्ये रुपांतरीत पहिली ते पाचवी पर्यंतच्या डिजिटल स्वरूपातल्या पाठ्यपुस्तकांचे कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले.
भारतीय सांकेतिक भाषा क्षेत्रात केंद्राने केलेल्या कामाची प्रतिमा भौमिक यांनी प्रशंसा केली. सांकेतिक भाषा ही श्रवण विकलांग समुदायाला सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या जोडणारी असल्याने या भाषेचे सामाजिक दृष्टीकोनातून महत्व नारायण स्वामी यांनी अधोरेखित केले.
दिव्यांग व्यक्ती या मनुष्यबळाचा अविभाज्य भाग असल्याचे सांगून त्यांना जास्तीतजास्त संधी सुलभता प्रदान करण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे डॉ वीरेंद्र कुमार यांनी सांगितले. दिव्यांगांचे सबलीकरण आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी मंत्रालय अनेक निर्णय आणि धोरणे आखत आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘सबका साथ, सबका विकास,सबका विश्वास यासह सबका प्रयास’ हा दृष्टीकोन साकार करण्यासाठी दिव्यांग जनांचे सबलीकरण आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले.