जळगावात भरदिवसा गोळीबार, एकजण झाला जखमी
जळगाव
शहरातील कांचननगरात आज सकाळी सव्वाआठ वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. रिक्षातून आलेल्या 4 ते 5 हल्लेखोरांनी कांचननगरातील मध्यवर्ती भागातील एका घरात घुसून, झोपेत असलेल्या 2 भावंडांवर गोळीबार केला. हल्लेखोरांनी 4 ते 5 राऊंड फायर केले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र, हाताला गोळी लागून एकजण जखमी झाला आहे. दिवसा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
कांचननगर परिसरात राहणारे मुरलीधर सपकाळे यांच्या घरावर अज्ञात 4 ते 5 हल्लेखोरांनी आज सकाळी गोळीबार केला. मुरलीधर सपकाळे हे घराबाहेर खाटेवर झोपलेले होते. तर त्यांची दोन्ही मुले आकाश व सागर सपकाळे हे घरात झोपलेले होते. रिक्षातून आलेल्या हल्लेखोरांनी घरात घुसून झोपेत असलेले आकाश व सागर यांच्या अंगावरील चादर ओढून, गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. यावेळी हल्लेखोरांसोबत झटापट झाल्याने दोघे बालंबाल बचावले. या झटापटीत आकाशच्या हाताला गोळी लागल्याने तो जखमी झाला. यावेळी झटापटीत हल्लेखोरांपैकी एकजण खाली पडल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. दरम्यान, तो घटनास्थळीच पडून होता. या प्रकारानंतर हल्लेखोर पळून गेले.
पिस्तूल घटनास्थळी सोडून हल्लेखोरांचा पळ-
गोळीबार केल्यानंतर पिस्तूल घटनास्थळी सोडून हल्लेखोरांनी पळ काढला. या गोळीबारात 4 ते 5 राऊंड फायर झाले असून, फायर झाल्यानंतर काडतुसे घरात व आजूबाजूला पडलेली आहेत. पोलिसांनी पिस्तूल व काडतुसे जप्त केली आहेत.
घटनास्थळी बघ्यांची गर्दी, परिसरात दहशतीचे वातावरण-
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. सकाळच्या सुमारास भरवस्तीत गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही वेळानंतर शनिपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली.
घटनेला पूर्ववैमनस्याची किनार?
या गोळीबाराच्या या घटनेला पूर्ववैमनस्याची किनार असल्याचे बोलले जात आहे. जळगाव शहरात काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा रात्रीच्या वेळी खून झाला होता. त्या गटातील तरुणांनी बदलाच्या उद्देशाने आज हा गोळीबार केल्याची चर्चा आहे. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
जळगावमध्ये गुंडाराज?
जळगाव शहरासह जिल्ह्यात सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे जळगावमध्ये गुंडाराज निर्माण झाले आहे की काय, अशी चर्चा सुरू आहे. पोलिसांचा धाक नसल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच खुनाच्या गुन्ह्यातील एका संशयित आरोपीचा जामिनावर सुटल्यानंतर काही तासातच गोळीबार व चॉपरने वार करून निघृर्णपणे खून झाला होता. या घटनेला काही तास उलटत नाही; तोच जळगावात पुन्हा भरदिवसा गोळीबाराची घटना घडली आहे.