पुणे : वर्षभरापूर्वी मुलांचे निधन; नैराश्यात असलेल्या पित्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे

नांदेड फाटा येथे राहणार्‍या एका व्यक्तीने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा येथे घडली आहे. संजीव दिगंबर कदम (40) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्या दोन्ही मुलांचे (एक मुलगा व एक मुलगी) एक वर्षभरापूर्वी आजारपणामुळे निधन झाले होते. तेव्हापासून ते नैराश्यात होते.

मुलांच्या निधनापासून होते नैराश्यात –

मिळालेल्या माहितीनुसार वर्षभरापूर्वी संजीव कदम यांचा चौदा वर्षांचा मुलगा व दहा वर्षांची मुलगी या दोघांचेही काही दिवसांच्या अंतराने आजारपणामुळे निधन झाले होते. दोन्ही मुलांच्या निधनापासून कदम हे निराश राहायचे. मुलांच्या विरहामुळे नैराश्यातून कदम यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद –

दोन दिवसांपूर्वी संजीव कदम हे पत्नीला नांदेड जिल्ह्यातील गावी माहेरी सोडून आले होते. 20 सप्टेंबर रोजी दुपारपासून त्यांची पत्नी फोन लावत होती. परंतु संजीव कदम फोन उलत नव्हते. शेवटी रात्री नऊ वाजेच्या सुमारास कदम यांच्या पत्नीने ओळखीच्या काहींना फोन करुन घरी जाऊन पाहण्यास सांगितले. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने दरवाजा तोडला असता संजीव कदम हे पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यांनी तत्काळ ही माहिती हवेली पोलीस ठाण्याला दिली. याबाबत हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!