केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाबाबत बैठक घेतली
नवी दिल्ली,
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंर्द्र प्रधान यांनी डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याबाबत बैठक घेतली. शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या सचिव अनिता करवाल, बीआयएसएजी-एन चे महासंचालक डॉ. टी. पी. सिंह, डीजी, प्रसार भरतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी एस. वेंपती आणि शिक्षण मंत्रालयाचे अन्य अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
एकात्मिक डिजिटल परिसंस्था विकसित करण्यासाठी उपग-ह तंत्रज्ञान आणि इंटरनेटचा लाभ घेण्यावर चर्चा केंद्रित होती. शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, कौशल्य विकास आणि शिक्षक प्रशिक्षणाच्या सर्व क्षेत्रांमध्ये विद्यमान मंचांचा विस्तार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याबाबत नावीन्यपूर्ण दृष्टिकोन अवलंबण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनी विद्यमान स्वयं प्रभा उपक्रम मजबूत करण्याचे आणि राष्ट्रीय डिजिटल शिक्षण व्यवस्था (एनडीईएआर) आणि राष्ट्रीय शिक्षण तंत्रज्ञान मंच (एनईटीएफ) सारख्या उपक्रमांमध्ये समन्वय साधण्याचे आवाहन केले. प्रधान यांनी डिजिटल दरी सांधण्याची आणि शिक्षणामध्ये अधिकाधिक समावेशकता आणण्यासाठी शिक्षणापासून वंचित असलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या गरजेवर भर दिला.
ते म्हणाले की, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, कौशल्य विकास मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, दूरसंचार विभाग, प्रसार भारती, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, बीआयएसएजी-एन आणि अंतराळ विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांची एक समिती स्थापन केली जाऊ शकते.