मुंबईत 100 टक्के लसीकरण झालेल्या इमारतींवर ’फुल्ली वॅक्सिनेटेड’चा लोगो; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची संकल्पना

मुंबई,

मुंबईत 100 टक्के लसीकरण झालेल्या सोसायटी, इमारती आणि कार्यालयांवर ’फुल्ली वॅक्सिनेटेड’ म्हणजे, पूर्णपणे कोरोनाची लस घेतलेली इमारत, असा फलक लावण्यात येणार आहे. मुंबईकरांना प्रोत्साहित करण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही संकल्पना आणली आहे. इमारतीमध्ये राहणार्‍या अथवा काम करणार्‍या अशा सर्वांचं लसीकरण झालेलं असेल, तर इमारतीच्या प्रेवशद्वारावर ’फुल्ली वॅक्सिनेटेड’ असा एक लोगो लावण्यात येईल आणि त्यासाठी इमारतीमधील सर्व पात्र व्यक्तींचे दोनही कोरोना लसीचे डोस झालेले असणं आवश्यक आहे. या लोगोमुळे कोरोना प्रसाराचा धोका कमी होईल आणि इतरांनाही प्रोत्याहन मिळेल, अशी अपेक्षा मुंबई महानगरपालिकेला आहे.

मुंबईतील 100 टक्के लसीकरण झालेल्या इमारतींवर ’फुल्ली वॅक्सिनेटेड’ असा लोगो लावण्यात येणार आहे. जिल्हाधीकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी याबाबत सूचना दिल्या आहेत. संबंधित इमारतीत राहणार्‍या किंवा काम करणार्‍या अशा सर्वांचं लसीकरण झालेलं असल्यास अशा इमारतींच्या प्रवेशद्वारावर मुंबई महापालिका विशिष्ट लोगो लावणार आहे. त्यासाठी इमारतीतील सर्व पात्र व्यक्तींचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असणं आवश्यक आहे. यामुळं ज्यांनी अद्याप लसीकरण केलेलं नाही, किंवा लसीकरणासाठी ज्यांच्याकडून टाळाटाळ केली जाते, अशा व्यक्तींना लसीकरणासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी मुंबई महापालिकेला आहे. तसेच संबंधित इमारतीतून कोरोना प्रसाराचा धोका कमी असल्याचं इतर लोकांनाही समजण्यास यामुळं मदत होणार आहे, असं सांगण्यात येत आहे.

मुंबईत नुकताच गणेशोत्सव पार पडला. पुढील 15 दिवस आता मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. गेल्या वर्षी गणेशोत्सवानंतरच कोरोनाची दुसरी लाट आल्याचं पहायला मिळालं होतं. त्यामुळेच यंदाच्या गणेशोत्सवाच्या नंतरच्या 15 दिवसांवर प्रशासनाची बारीक नजर असणार आहे.

सध्या मुंबईसह अवघ्या महाराष्ट्रावर कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचं सावट आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवानंतर मुंबईतील आणि राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे येणारे 15 दिवस धोक्याचे आणि अत्यंत महत्वाचे असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.

मुंबईत गेल्या 24 तासात 419 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 447 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,19,394 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मागील 24 तासात मुंबईत एकूण 31 हजार 880 नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. मुंबईत गेल्या 24 तासात पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4595 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1194 दिवसांवर गेला आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!