’हार्ट अटॅक’नं मेलेली महिला 45 मिनिटांनी पुन्हा झाली जिवंत, डॉक्टरही चकित

न्यूयॉर्क

देव तारी त्याला कोण मारी, अशी मराठीत म्हण आहे. एखादी व्यक्ती आश्चर्यकारकरित्या मृत्यूच्या सापळ्यातून कशी वाचली, याची अनेक उदाहरणं आपल्याला अवतीभोवती दिसतात. मात्र एक व्यक्ती मरण पावल्यानंतर ती पुन्हा जिवंत झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं मरण पावलेली महिला 45 मिनिटांनंतर पुन्हा जिवंत झाल्याचं पाहून डॉक्टरही चकीत झाले. हा प्रकार अत्यंत दुर्मिळ असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

अमेरिकेच्या मेरीलँडमध्ये राहणार्‍या कैथी पॅटन या मैदानात गोल्फ खेळत होत्या. त्यांची मुलगी गर्भवती होती आणि तिला नववा महिना सुरु होता. गोल्फ खेळत असतानाच त्यांच्या मुलीला प्रसवकळा सुरू झाल्याचा फोन आला. त्यानंतर कैथी धावतच मुलीकडे गेल्या आणि तिला घेऊन रुग्णालयात पोहोचल्या. मुलीला डॉक्टरांनी ताब्यात घेतलं आणि तिच्या डिलिव्हरीची प्रक्रिया सुरु झाली. मात्र तेवढ्यात कैथी यांना जबर हार्ट अटॅक आल्या आणि त्या तिथेच कोसळल्या.

रुग्णालयातच हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांना तातडीनं ऑॅपरेशन थिएटरमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र काही मिनिटांतच त्यांच्या हृदयाचे ठोके पूर्णत: थांबले आणि मेंदूला होणारा ऑॅक्सिजनचा पुरवठाही बंद झाल्याचं डॉक्टरांना दिसलं. डॉक्टरांनी कैथी यांचा मृत्यू झाल्यामुळे अखेरचा उपाय म्हणून सीपीआर द्यायला सुरुवात केली. तरीही कैथी यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता.

हृदय बंद पडल्यामुळे डॉक्टरांनी कैथी यांना मृत घोषित केलं. मात्र 45 मिनिटांनी कैथी यांच्याकडून पुन्हा प्रतिसाद यायला सुरुवात झाली. त्यांचा श्वास परत आला आणि मेंदूला होणारा ऑॅक्सिजनचा पुरवठाही सुरळीत झाला. वैद्यकीय क्षेत्रातील हा एक चमत्कारच असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

कैथी यांच्यावर उपचार सुरू असतानाच दुसरीकडे त्यांच्या मुलीची डिलिव्हरी झाली आणि कैथी आजी झाल्या. कैथी यांची प्रकृती आता उत्तम असून त्यांना कुठलाही त्रास नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. निसर्गाच्या या चमत्काराची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!