विराटचा दुसरा धक्का, सोडणार आरसीबीचे नेतृत्व
नवी दिल्ली
टी 20 कप्तानपदाचा राजीनामा दिल्यावर विराट कोहलीने आणखी एक धक्का देताना आयपीएल 2021 संपल्यावर रॉयल चॅलेंजर बंगलोर टीमच्या नेतृत्व पदावरून पायउतार होत असल्याची घोषणा केली आहे. गुरुवारी त्याने टी 20 टीम कप्तानपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. विराट 2013 पासून रॉयल चॅलेंजर बंगलोरचा कप्तान आहे मात्र आयपीएलच्या नउ सिझन मध्ये त्याला टीम साठी एकही खिताब मिळविता आलेला नाही. 2016 च्या सिझन मध्ये बंगलोर टीम फायनल मध्ये गेली होती पण त्यांना चँपियनशिप मिळविता आली नव्हती.
आरसीबीचे कप्तानपद सोडण्याची घोषणा करताना विराट म्हणाला,’ माझ्यासाठी हा सर्व काळ चांगला होता. या टीममध्ये प्रतिभावान खेळाडूंचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. हा सगळा अनुभव मस्त होता आणि त्याबद्दल टीम व्यवस्थापक, कोच, सपोर्ट स्टाफ, खेळाडू, आरसीबी परिवारला धन्यवाद. नेतृत्व सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता मात्र फ्रेन्चाईजीच्या चांगल्या भविष्यासाठी तो आवश्यक होता. क्रिकेट मधून निवृत्त होईपर्यंत याच टीमकडून खेळत राहीन.’
विराटने 132 सामन्यात या टीमचे नेतृत्व केले असून त्यात 60 विजय, 65 पराजय, 3 टाय तर 4 सामने अनिर्णीत राहिले आहेत. आरसीबी साठी त्याने एकूण 199 सामने खेळताना 6076 धावा काढल्या आहेत. सोमवारी कोलकाता टीम बरोबर होत असलेला सामना विराटचा 200 वा सामना आहे. कप्तानपदाच्या 132 सामन्यात त्याने 4674 धावा काढल्या असून त्यात पाच शतके आहेत.