धक्कादायक! आईवडिलांविरोधात सुपरस्टार अभिनेत्याची तक्रार
हैदराबाद
सहसा आईवडिलांचं मत पटलं नाही, तर त्यांवर उघडपणे आपलं मत मांडत नाराजी व्यक्त करण्याकडे अनेकांचा कल. त्यांची मतं पटली नाहीत किंवा त्यांची एखादी भूमिका पटली नाही यासाठी थेट कायद्याकडेच मदत घेणारं कुणी फार क्वचितच दिसतं. पण, सध्या कला वर्तुळामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. जिथं एक सुपरस्टार आईवडिलांसह इतर 11 जणांविरोधात उभा ठाकला आहे.
हा अभिनेता म्हणजे थपालती विजय. त्यानं मद्रास उच्च न्यायालयामध्ये आपल्याच आईवडिलांविरोधात आणि इतर 11 जणांविरोधात खटला दाखल केला आहे. विजयचे वडील आणि दिग्दर्शक एस.के. चंद्रशेखर यांनी काही काळापूर्वी एक राजकीय पक्ष सुरू केला होता. या पक्षाचं नाव थलापती विजय मक्कल इयक्कम असं ठेवण्यात आलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार निवडणूक आयोगामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार या पक्षाच्या सचिवपदी विजयच्या वडिलांचं तर, खजिनदारपदी त्याच्या आईचं नाव नमूद करण्यात आलं आहे.
नेमकं काय चुकलं?
काही काळापूर्वी आपला कोणत्याही राजकीय पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचं विजयनं सांगितलं होतं. आपल्या या वक्तव्यादरम्यान, फक्त नाव पाहून कोणत्याही पक्षात सहभागी होऊ नका असं आवाहन त्यानं चाहत्यांना केलं होतं. इतकंच नव्हे तर, आपलं नाव किंवा फोटोचा वापर कोणीही केल्यास आपण त्याच्याविरोधात तक्रार करणार असल्याचा इशाराही त्यानं दिला होता. अखेर त्यांनं आपला शब्द राखत हे मोठं पाऊल उचललं.
बाल कलाकार म्हणून कारकिर्दीस सुरुवात…
विजयनं एक बालकलाकार म्हणून चित्रपट कारकिर्दीस सुरुवात केली होती. ’नालया थीरपू’ या चित्रपटातून तो पहिल्यांदाच मुख्य अभिनेत्याच्या रुपात झळकला होता. 1992 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा विजयचं वय अवघं 18 वर्षे इतकंच होतं.