परभणीत शिवसेनेने घातले मनपा प्रशासनाचे श्राद्ध
परभणी,
शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. तसेच पार्किंगची व्यवस्था आणि स्वच्छतेचे प्रश्न देखील गंभीर झाले आहे. या संदर्भात वेळोवेळी सांगूनही मनपा प्रशासनाला जाग येत नाही. त्यामुळे मनपा प्रशासन जिवंत आहे की नाही ? असा सवाल उपस्थित करत सोमवारी पितृपक्षाच्या सुरुवातीलाच शिवसेनेतर्फे मनपा प्रशासनाचे श्राद्ध घालून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
शहरात पार्किंगची सुविधा अत्यंत तोकडी असून, सणासुदीच्या काळात खरेदीसाठी येणार्या नागरिकांना रस्त्यावरच वाहने उभी करावी लागतात. परिणामी वाहतूक पोलीसांकडून ही वाहने जप्त करून नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे मनपाने शहरात पार्किंगची व्यवस्था करावी. याबरोबरच कोरोनाच्या काळात स्वच्छतेकडे देखील मनपाचे दुर्लक्ष होत आहे. या विरोधात निवेदने देवून, आंदोलने करून देखील मनपा लक्ष देत नाही. त्यामुळे मनपाचे प्रशासन मेले की काय ? असा सवाल उपस्थित करत मनपाच्या माजी विरोधी पक्षनेते तथा शिवसेना विधानसभेच्या महिला संघटक अंबिका डहाळे यांनी मनपाचे श्राद्ध घातल्याचे सांगितले.
परभणी शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे लोकांना कमरेचे आणि मानेचे त्रास उद्भवत आहेत. या खड्ड्यांमध्ये पडून दुचाकीस्वरांचे अपघात होत आहेत. परिणामी लोकांना मोठ्या प्रमाणात जखमी व्हावे लागते. शहरातील शिवाजी चौक, गांधी पार्क, स्टेशन रोड या भागासह जुना पेडगाव रोड, कारेगाव रोड, नांदखेडा रोड, गंगाखेड रोड आणि बस स्थानकासमोर आदी महत्त्वाच्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. या रस्त्यांवर दुचाकीस्वाराचे अपघात नित्याचे झाले आहेत. तसेच या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून यामुळे डेग्यू आणि इतर संसर्गजन्य आजारांचा फैलाव होत असल्याचे शिवसेना उपशहरप्रमुख संभानाथ काळे म्हणाले.
शहरातील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत, तसेच स्वच्छतेसह पावसाच्या पाण्याचा तसेच सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्यांची दुरुस्ती करावी, पार्किंगची व्यवस्था करावी, अन्यथा याहूनही तीव- आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी मनपाच्या आयुक्तांना देण्यात आला आहे. या आंदोलनात शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, उपशहरप्रमुख संभानाथ काळे, मारुती तिथे, उध्दव मोहिते, युवासेनेचे विशू डहाळे, बाळराजे तळेकर, मनपाचे गटनेते चंदू शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.