’मोदी है तो मुमकीन है’; सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा मोदींची स्तुती

मुंबई

शिवसेनेचे मुखपत्र सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करण्यात आली आहे. ’मोदी है, तो मुमकीन है’ अशा शब्दांत सामनाच्या अग-लेखातून मोदींची स्तुती करण्यात आली आहे. मोदी हाच भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आहे व बाकी सारे फाटके मुखवटे आहेत. मोदींचा चेहरा नसेल तर भाजपातील सध्याचे अनेक नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील, असे सामनाच्या अग-लेखात म्हटले आहे.

काय म्हटले आहे अग-लेखात? –

भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी डॉ. नड्डा आल्यापासून पक्षात सतत फेरबदल होत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या मनात आहे. ते डॉ. नड्डा यांच्या माध्यमातून करून घेतले जात आहे. नड्डा यांच्याच माध्यमातून उत्तराखंड व कर्नाटकचे मुख्यमंत्री बदलले गेले. गुजरातचे मुख्यमंत्रीही एका खटक्यात बदलले. तेथे तर संपूर्ण मंत्रिमंडळच नवेकोरे करून टाकले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे प्रथमच आमदार झालेले नेते, पण आता मोदी-नड्डांनी असा धक्का दिला की, राजकारणात काहीच अशक्य नाही. रूपाणी यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना मोदी व नड्डांनी घरी बसवले आहे. ज्या 24 मंत्र्यांनी शपथ घेतली ते सर्व प्रथमच मंत्री झाले. नितीन पटेल यांच्यासह सर्व जुन्या-जाणत्यांना मोडीत काढून मोदी व नड्डा यांनी गुजरातेत नवा डाव मांडला आहे. राजेंद्र त्रिवेदी हे विधानसभेचे अध्यक्ष होते. त्यांनाही पायउतार केले व मंत्री केले. रूपाणी यांच्यामागे अमित शहांचे पाठबळ होते, पण रूपाणी व त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळास घरचा रस्ता दाखवून मोदी-नड्डा जोडीने एक जोरदार राजकीय संदेश स्वपक्षास दिला आहे. मावळते उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे स्वत:ला ’हेवीवेट’ समजत होते. रूपाणी यांना मुख्यमंत्री केले तेव्हाही नितीन पटेल हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते व आता रूपाणी यांना बाजूला केले तेव्हाही तेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. एकतर ते गुजरातमधील पाटीदार समाजाचे महत्त्वाचे नेते आहेत व पाटीदार समाजात त्यांचे वजन आहे.

’पाटीदार समाजाचे मोठे आंदोलन’ –

पाटीदार समाजाचे मोठे आंदोलन गुजरातमध्ये झाले तेव्हापासून हा समाज अस्वस्थ आहे. उद्याच्या विधानसभा निवडणुकीत या असंतोषाचा फटका बसेल व गुजरातमध्ये भाजपाची फजिती होईल, याचा अंदाज आल्यानेच आधी रूपाणी यांना त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळासह घरी पाठवले. पण नेतृत्वाची घडीच पूर्ण बदलून टाकताना पाटीदार समाजाचे नेते नितीन पटेल यांनाही मोडून काढले. नव्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री पटेल यांच्यासह 14 मंत्री पाटीदार व ओबीसी समाजाचे आहेत. हे धाडसाचे काम असले तरी स्वपक्षात अशी धाडसी पावले मोदीच टाकू शकतात. मोदी आता सत्तर वर्षांचे झाले. त्यामुळे त्यांची पावले अधिक दमदार पद्धतीने पडत आहेत आणि वाटेतले काटेकुटे ते स्वत:च दूर करीत आहेत. मोदी राष्ट्रीय राजकारणाचे सूत्रधार बनताच त्यांनी पक्षातील अनेक जुन्या-जाणत्यांना दूर करून मार्गदर्शक मंडळात नेमले. म्हणजे हे मार्गदर्शक मंडळ कामापुरते नसून उपकारापुरतेच ठेवले. आडवाणी, मुरली मनोहर जोशी हेसुद्धा त्याच मार्गदर्शक मंडळात बसून आहेत. कालच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील फेररचनेत अनेक जुन्यांना मोदी यांनी घरचा रस्ता दाखवून नव्यांना स्थान दिले. रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांच्यावरही मंत्रीपद गमावण्याची वेळ आली. मोदी यांनी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू केली आहे व त्या कामी सूत्रे स्वत:कडे ठेवण्याचे ठरवले आहे. देशात एकंदरीत गोंधळाचे चित्र आहे. लोकांत तसेच विरोधकांत मोदींच्या कार्यपद्धतीविषयी जो रोष दिसतोय त्यास स्वत: मोदी किती जबाबदार व त्यांच्या अवतीभवतीचे लोक किती कारणीभूत आहे. हे समजून घेण्याची वेळ मोदी-नड्डांवर आली व त्यातूनच गुजरातपासून उत्तराखंडपर्यंत स्वच्छता मोहीम त्यांना हाती घ्यावी लागली.

’मोदी है तो मुमकीन है’ –

गेल्या काही महिन्यांत एक आसाम सोडले तर प. बंगाल, तामीळनाडू, केरळात भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. पश्चिम बंगालात तर अमित शहा यांनी जिवाची बाजी लावली होती. केरळात ई. श्रीधरनसारखा मोहरा कामी लावला होता. अमित शहा हे कोणताही चमत्कार घडवू शकतात अशी प्रचार मोहीम राबवली गेली. पण अमित शहा यांच्याच काळात महाराष्ट्रात 25 वर्षे जुन्या शिवसेना-भाजपा युतीचा तुकडा पडला व आता तर भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. पश्चिम बंगालातही कपाळमोक्ष झाला. जे. पी. नड्डा यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले असावे ते यामुळेच. मोदी हाच भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आहे व बाकी सारे फाटके मुखवटे आहेत. मोदींचा चेहरा नसेल तर भाजपातील सध्याचे अनेक नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील. मोदी यांना स्वत:चे हे बलस्थान माहीत असल्यामुळेच त्यांनी 2024 च्या तयारीसाठी साहसी पावले टाकायला सुरुवात केली आहे. तीन राज्यांचे मुख्यमंत्री मोदी-नड्डा जोडीने बदलले. गुजरातमध्ये तर सारी जमीन उकरून किडकी झाडे मुळापासून उपटून टाकली. मध्य प्रदेश, हिमाचल, हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांवर मोदी-नड्डांचे बारीक लक्ष आहे. मोदींनी गुजरातेत सर्वच बदलले. या धसक्यातून पक्षाला सावरायला वेळ लागेल व हाच प्रयोग त्यांची सरकारे नसलेल्या प्रदेशांतही होऊ शकतो. ’मोदी है तो मुमकीन है’ म्हणायचे ते इथे!

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!